प्रतिनिधी/ रत्नागिरी
नैसर्गिक संकटांमुळे कमी झालेले उत्पादन व कोरोनाच्या महासंकटाचा हापसू निर्यातीला जोरदार फटका बसला असून गतवर्षीच्य तुलनेत एप्रिलमध्ये झालेली निर्यात निम्म्यावर आली आहे. वाशी मार्केटमधून सागरी व हवाईमार्गे एप्रिल अखेरपर्यंत एकूण 4120 मेट्रीक टन हापूस आंब्याची निर्यात झाली असून गतवर्षी याच कालावधीत 8 हजार 835 मेट्रीक टनची निर्यात झाल्याची माहिती कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक भास्कर पाटील यांनी दिली.
यंदा समुद्रमार्गे जेएनपीटी पोर्टमार्फत आखाती देशांमध्ये जहाजातून 2 हजार 235 मेट्रीक टन हापूस निर्यात करण्यात आला आह़े तर 1 हजार 885 मेट्रीक टन युरोपात हवाईमार्गे निर्यात करण्यात आला आह़े हा आंबा प्रामुख्याने बहारीन, कुवेत, ओमान, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, इंग्लंड आदी देशांच्या बाजारपेठांमध्ये पोहचला आहे.
गत वर्षीच्या विविध संकटांमुळे यंदा आंब्याचे उत्पादनही कमी आहे. त्यातच कोरोनाच्या संकटामुळे आंबा विपणनाचा प्रश्न खुपच जटील बनला होता. अशा कठीण परिस्थितीतमध्ये बागायतदारांना दिलासा देण्यासाठी हवाईमार्गे आंब्याच्या निर्यातीसाठी प्रयत्न करण्यात आले. त्यानुसार काही खासगी विक्रेत्यांच्या मदतीने खासगी विमानांमधून एकूण 4 हजार 120 मेट्रीक टन हापसूची निर्यात करणे शक्य झाले आह़े
यावर्षी कोरोनामुळे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया, न्युझिलंड इत्यादी देशांमध्ये हवाई वाहतूक सेवा पूर्णत बंद आहे. त्यामुळे विमान सेवा उपलब्ध नसल्यामुळे पर्यायाने या देशामध्ये हापुसची निर्यात कमी झाली आह़े तसेच या वर्षी हापूस हंगाम उशिरा चालू झाला असून उत्पादनही कमी आह़े यामुळेच निर्यातसुद्धा काही प्रमाणात कमी झाले असल्याचे पणन मंडळाकडून सांगण्यात आले.
हापूस व्यतिरिक्त इतर नाशवंत फळे, भाजीपाला निर्यातीमध्ये मोठय़ा प्रमाणात घट होण्याची शक्यता होत़ी असे असताना देखील कृषी पणन मंडळाने फळे व भाजीपाला यांची निर्यात मध्य-पूर्व देशांमध्ये करण्यात पणन मंडळाला यश आले आह़े कोरोनामुळे विसकळीत झालेल्या निर्यातीसाठी व्यापाऱयांना मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या वॉर रुमची मोठी मदत झाल्याचेही त्यांनी सांगितले.









