एक तारखेपासून सुट्टीचा विचार
प्रतिनिधी /बेळगाव
एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत पहिली ते नववीच्या परीक्षा संपविण्याची सूचना शाळांना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एक मेपासून शाळांना सुटी जाहिर करण्याची शक्यता आहे. अद्याप याबाबत जिल्हा शिक्षणाधिकाऱयांकडून रितसर आदेश जारी करण्यात आला नसला तरी याबाबत शहर आणि ग्रामीण गटशिक्षणाधिकाऱयांनी दुजोरा दिला आहे.
28 मार्चपासून दहावीच्या वार्षिक परीक्षा सुरु होणार आहेत. 11 एप्रिलला या परीक्षा पूर्ण होणार आहेत. तत्पूर्वी पहिली ते नववीच्या परिक्षा पूर्ण कराव्यात, अशी सूचना शिक्षण खात्याने शाळांना केली आहे. पहिली ते पाचवीचा निकाला 11 एप्रिल तर सहावी ते नववीपर्यंतचा निकाल 13 एप्रिल पर्यंत जाहीर करावा, असे शाळांना सूचविण्यात आले आहे. त्यामुळे शाळांनी पूर्वतयारी सुरु करण्यात आली आहे.
गेल्या दोन वर्षात शाळांत परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. यंदा मात्र एप्रिलपूर्वीच शाळांत परीक्षा पूर्ण कराव्यात, असे सूचविण्यात आले आहे. दहावीच्या परीक्षा पूर्ण करून किमान एक मेपासून सुटय़ा जाहीर करण्याचा विचार शिक्षण खात्याने चालविला आहे. दरम्यान, पुन्हा महिना अगोदरच शाळा सुरु करण्याचीही तजविज केली जात आहे.
30 पर्यंत शिक्षक ऑन डय़ुटी
यापूर्वी परिक्षा झाल्यानंतर लागलीच शिक्षकांनाही उन्हाळी सुट्टी मिळायची. परंतु यावेळी 30 एप्रिलपर्यंत शिक्षकांना ऑन डय़ुटी रहावे लागणार आहे. याबाबत ग्रामिणचे गट शिक्षणाधिकारी ए. बी. जुटन्नावर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अद्याप आदेश जारी करण्यात आले नसले तरी याबाबत शासकीय निर्णय झाला असल्याचे सांगितले.









