निविदा मागविण्याचा प्रस्ताव : बैठकीत विविध ठराव संमत : गाळे भाडेवाढ न करण्यावर विचार
वार्ताहर /कंग्राळी खुर्द
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पथदीपांना विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी निविदा मागविणे, थकीत भाडे वसुली करणे, दुकानांची गळती काढणे, सुरक्षा रक्षक, बाजार समितीमधील स्वच्छता यासाठी निविदा काढणे, मार्केट यार्ड, अनगोळ, वडगाव, सीबीटीमार्गे बस सुरू करणे, शासनाने दुकान गाळय़ांच्या वाढलेल्या भाडय़ामध्ये कपात करणे आदी विषयांवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मंगळवारी झालेल्या कार्यकारिणीच्या मासिक बैठकीमध्ये ठराव करण्यात आले.
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी चेअरमन युवराज कदम होते. यावेळी व्हा. चेअरमन महादेवी खणगौडर, सचिव डी. कोळीगौडा उपस्थित होते. सुरुवातीला सचिव डी. कोळीगौडा यांनी सर्वांचे स्वागत करून मागील बैठकीच्या वृत्तांताचे वाचन केले.
भाडेवाढ कमी करण्याचा ठराव
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाडेकरू गाळेधारकांच्या मासिक भाडय़ांमध्ये 50 टक्के वाढ करण्याचा आदेश मुख्य कार्यालयामधून आला आहे. याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी कोरोनामुळे दोन वर्षापासून भाडेकरू अनेक समस्यांना सामोरे जात व्यवसाय करत आहेत. कोरोनामुळे व्यापारी वर्गावर मोठा परिणाम झाला आहे. यासाठी अधिक भाडेवाढ न करता ती अल्पप्रमाणात करण्याचा ठराव करण्यात आला.
दुकानांची गळती काढणे
येथील व्यापारी वर्गाला देण्यात आलेल्या अनेक गाळय़ांमध्ये गळती लागली आहे. त्यामुळे याचा त्रास व्यापारी वर्गाला होत आहे. त्यांच्या मागणीनुसार गळती लागलेल्या दुकानांमधील गळती काढणे याबद्दल चर्चा होऊन गळती काढण्याचा ठराव करण्यात आला.
थकीत भाडे वसुली करणे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी मार्केटमधील सी ब्लॉकमधील गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आली आहेत. मात्र यामधील अनेक व्यापाऱयांनी नियमित भाडे भरले नाहीत. त्यामुळे थकीत असलेले भाडे वसूल करण्याबाबत चर्चा करून त्यावर कडक कारवाई करून थकीत भाडे वसूल करण्याचा ठराव करण्यात आला.
निविदा काढण्याचा ठराव
येथे नवीन गाळे बांधण्यात आलेले आहेत. ते व्यापारी वर्गाला भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा काढणे, शिवाय बाजार समितीमधील स्वच्छता करण्यासाठी निविदा आणि सुरक्षा रक्षकांचे टेंडरसुद्धा नव्याने काढण्याचा ठराव करण्यात आला.
याशिवाय बाजार समितीमधील पथदीपांचा विद्युत पुरवठा वर्षभरापासून बंद आहे. त्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. येथील रस्ते आणि गटारी बांधकामावेळी अंतर्गत वीजपुरवठा बंद झाला आहे. यासाठी नव्याने निविदा मागविण्याचा ठराव करण्यात आला आहे.
बाजार समितीसाठी बससेवा सुरू करणे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी पूर्वी दिवसातून तीनवेळा बससेवा उपलब्ध होती. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ती बससेवा बंद करण्यात आली आहे. याचा त्रास बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकरी, व्यापारी, खरेदीदारांना होत आहे. यासाठी पूर्वीप्रमाणे कायमस्वरुपी बससेवा सुरू करण्यासाठी संबंधित खात्याला निवेदन देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आला.
बैठकीए माजी अध्यक्ष निंगाप्पा जाधव, आनंद पाटील, व्यापारी प्रतिनिधी महेश कुगजी, तानाजी पाटील, आर. के. पाटील, महेश जुवेकर, मनोज मत्तीकोप, सुधीर गड्डे, लगमाप्पा नाईक, संजीव मादार, शिवाजी तिपाण्णाचे आदी उपस्थित होते.
भाजीचा व्यवहार सायंकाळपर्यंत करण्याची मागणी
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या सकाळच्या सत्रात भाजी मार्केटमधील व्यवहार होत आहेत. त्याचा परिणाम भाजी मार्केटच्या व्यवहारावर होत आहे. विशेषतः गोवा या राज्यावरच भाजीमार्केटची भिस्त आहे. गोवा राज्यामधून मोठय़ा प्रमाणात बेळगाव भाजीमार्केटमधून भाजीची निर्यात केली जाते. पूर्वी रात्री 12 वाजेपर्यंत भाजी ट्रकमध्ये भरून ती पहाटेपर्यंत गोव्याला जात होती. मात्र सध्या कोरोनामुळे बेळगाव भाजी मार्केटचे व्यवहार पहाटेपासून सुरुवात होत आहेत. यामुळे गोव्याला दुसऱया दिवशी भाजी मिळत आहे. त्यामुळे बराच उशीर होत असल्याने भाजी खराब होत आहे. याचा फटका व्यापारी वर्गाला होत आहे. यासाठी सायंकाळच्या सत्रातसुद्धा व्यवहार करण्यासाठी चालना द्यावी, याबाबतचे निवेदन भाजी मार्केटमधील व्यापारी बांधवांतर्फे देण्यात आले.









