एक महिन्याचा वेळ द्या, तोडगा काढू; जिल्हाधिकाऱयांचे स्पष्टीकरण : गैरप्रकार करणाऱयांवर कारवाई करण्याचे आश्वासन

प्रतिनिधी /बेळगाव
जय किसान भाजीमार्केट उभारणीबाबत सर्व तपशील जमा करून त्याचा अहवाल सरकारला पाठवून देऊ आणि त्यासाठी आपल्याला एक महिन्याचा अवधी द्यावा, असे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी स्पष्ट केले.
जय किसान मार्केट सुरू झाल्यानंतर या मार्केटचे पदाधिकारी आणि एपीएमसी यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे. जय किसान मार्केट अनधिकृत आहे, असे एपीएमसी सदस्यांचे म्हणणे आहे तर शेतकऱयांना उत्तम हमीभाव मिळावा, यासाठी हे मार्केट सुरू झाले आहे, असे जय किसानचे सदस्य सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी सकाळी दोन्ही मार्केटच्या पदाधिकाऱयांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकाऱयांनी दोन्ही बाजू ऐकून घेऊन एक महिन्याचा कालावधी मागितला आहे.
या बैठकीत बोलताना कृषक समाजाचे अध्यक्ष सिद्धगौडा मोदगी यांनी 2007 मध्ये मृत्यू पावलेल्यांच्या नावे 2014 मध्ये एनए लेआऊट चुकीच्या पद्धतीने केले गेले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातीलच अधिकारी या प्रकरणामध्ये सामील आहेत. वास्तविक एखादा व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याच्या नावाने खरेदी होते, हे धक्कादायक आहे. त्यामुळे उपनोंदणी कार्यालयातील अधिकारीदेखील या प्रकरणामध्ये सामील आहेत. तसेच हे मार्केट सुरू करण्यासाठी अनुकुलता दर्शविण्यास मनपा, बुडा, हेस्कॉम हे सुद्धा कारणीभूत असून त्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी सिद्धगौडा मोदगी यांनी केली. यावेळी जय किसान मार्केटचे सेपेटरी ए. के. बागवान, यांनी व इतर पदाधिकाऱयांनी शेतकऱयांना योग्य भाव देण्यासाठी आम्ही हे मार्केट उभे केले आहे. कोणत्या मार्केटला जाणे, हे शेतकऱयांवर अवलंबून आहे. आमच्या मार्केटमुळे शेतकऱयांचे शोषण थांबणार आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या स्पष्टीकरणानंतर जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱयांसमोरच शेतकरी-व्यापारी यांची वादावादी होऊन एकच गोंधळ उडाला.
एपीएमसी मार्केटमधील गैरप्रकाराबाबत चौकशी करा
जय किसान मार्केट उभे करताना महापालिकेने, एपीएमसीने, बुडाने परवानगी नाकारली होती. ज्या मार्केटला सर्वांनीच विरोध केला होता, अधिकाऱयांनीही परवानगी नाकारली होती, त्याच मार्केटला अचानक कशी परवानगी देण्यात आली? असा प्रश्न एपीएमसी सदस्यांनी विचारला. जय किसान मार्केटच्या पदाधिकाऱयांनीही आपली बाजू कशी योग्य आहे, शहराच्या बाहेर मार्केट असल्याने वाहतुकीची कोंडी होणार नाही. शेतकरी व व्यापाऱयांनाही त्याचा निश्चितच लाभ होणार आहे. या भाजीमार्केटला शेतकऱयांचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे सांगत एपीएमसी मार्केटमधील गैरप्रकाराबाबत चौकशी करावी, अशी मागणी केली.
तातडीने मार्केट बंद करा
या बैठकीत शेतकरी संघटनेच्या एका नेत्याने, सिद्धगौडा मोदगी यांना तुम्ही कोणाबरोबर आलात आणि कशासाठी आलात, असे म्हणत वाद घातला. त्यामुळे पुन्हा वातावरण तापले. त्यामुळे सदर शेतकरी नेत्याला पोलिसांनी बैठकीतून बाहेर जाण्यास सांगितले. यावेळी सिद्धगौडा मोदगी, सुजित मुळगुंद, राजू टोपण्णावर यांनी झालेल्या गैरप्रकाराची माहिती जिल्हाधिकाऱयांना दिली. जे अधिकारी यामध्ये सामील आहेत त्यांच्यावर कारवाई करावी व तातडीने हे मार्केट बंद करावे, अशी मागणीही केली.
यावेळी एपीएमसीचे कार्यदर्शी के. कोडीगौडा यांनी कोणत्या कायद्याच्या तरतुदीखाली जय किसान मार्केटला परवानगी दिल्याचे स्पष्ट केले. यावेळी शेतकऱयांनी त्यालाही जोरदार विरोध केला. एखादी कृषी संस्था असताना दुसऱया खासगी मार्केटला परवानगी देणे, हे कोणत्या कायद्यात बसते म्हणून त्यांना जाब विचारला. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दोन्ही बाजू ऐकून घेऊन मला महिन्याभराचा वेळ द्या, मी निश्चितच त्याबाबत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू. याचबरोबरच या प्रकरणामध्ये ज्यांनी गैरप्रकार केला आहे त्यांच्यावर कारवाई करू. तसेच सरकारलादेखील अहवाल पाठवू, असे सांगितले.
या बैठकीला बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे, मनपा आयुक्त रुदेश घाळी, पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा आदी उपस्थित होते. एपीएमसीचे अध्यक्ष युवराज कदम, आप्पा जाधव, रेणूका पाटील, आर. के. पाटील, महेश जुवेकर, सुधीर गड्डे, संजू मादार, लम्माण्णा नाईक, आसिफ मुल्ला, जय किसान मार्केटचे अध्यक्ष दिवाकर पाटील, मोहन मंडोळकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.









