वार्ताहर / कंग्राळी खुर्द
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी नवीन कांदा दरात 300 रु. तर महाराष्ट्र जुना कांदा 200 रुपयांनी वधारला. कर्नाटक जुना कांदा आणि सफेद कांद्याचे भाव मात्र स्थिर होते. स्थानिक बेळगाव बटाटय़ासहित परराज्यातील इंदोर, आग्रा बटाटय़ाचे भावसुद्धा स्थिर होते. हासन बटाटा 400 रु. तर महाराष्ट्रातील पुसेगावचा बटाटा 500 रु. कमी झाला. रताळी 100 रुपयांनी कमी झाली.
बुधवारी बाजारात 45 ट्रक कांदा, 2000 पोती जवारी बटाटा, परराज्यातील बटाटा 14 ट्रक, रताळी 6000 पोती आवक झाली होती.
45 ट्रक कांद्यापैकी कर्नाटकचा 30 ट्रक त्यामध्ये नवीन 15 ट्रक तर जुना 5 ट्रक, महाराष्ट्रातून 25 ट्रक जुना कांदा आवक होती.
मागील आणि आजच्या बाजारीसुद्धा आवक स्थिर होती. मात्र, कर्नाटक व महाराष्ट्रातील इतर बाजारात कांद्याचे भाव वधारले. शिवाय बेळगाव बाजारात प्रति बाजार 60 ट्रक कांद्याची गरज असते. त्यामानाने 15 ट्रक कांदा आवक कमी झाली. याचा परिणाम दरात वाढ झाली असल्याची माहिती व्यापारी विवेक पाटील यांनी दिली.
शनिवारपासून महराष्ट्रातील पुसेगाव परिसरातून नवीन बटाटा आवकेला सुरुवात झाली आहे. आवक प्रारंभी त्याचा भाव 2200 ते 3000 रुपये असा होता. 14 ट्रक परराज्यातील बटाटय़ापैकी इंदोर 4 ट्रक, हासन 4 ट्रक, आग्रा 1 ट्रक यांनी पुसेगाव परिसरातून 5 ट्रक बटाटा आवक झाली होती, अशी माहिती व्यापारी दीपक पाटील यांनी दिली.
बेळगावचा स्थानिक बटाटा शनिवारच्या बाजारी आणि बुधवारच्या बाजारीसुद्धा आवक स्थिर होती. बुधवारी आवक जावक स्थिर असल्याने भाव सुद्धा स्थिर होते. बाजारात लाल आणि सफेद बटाटा आवक मोठय़ा प्रमाणात होत आहे तर मसाद बटाटा आवक अंतिम टप्प्यात आहे. सफेद बटाटाय़ाला चांगली मागणी असल्याची माहिती व्यापारी राजू जाधव यांनी दिली.
शनिवारी रताळय़ाचा भाव 1200 ते 1800 रु. असा होता. तर बुधवारी चांगल्या प्रतीची रताळी 1500 ते 1700 रु. होती. तर दुय्यम दर्जाची रताळी 900 ते 1500 रु. झाली असल्याची माहिती शंकर चव्हाण यांनी दिली.









