बाजार समितीने वेळीच लक्ष घालून समस्या दूर करण्याची मागणी : मद्यप्राशन, अनैतिक धंद्यांना आवर घालण्याची गरज
वार्ताहर / कंग्राळी खुर्द
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गणेश मंदिर परिसरातील विद्युतपुरवठा खंडित होऊन महिन्याचा कालावधी लोटला तरी बाजार प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या परिसरातील व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत प्रशासनाला वारंवार कळवूनही प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याने व्यावसायिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
तरी संबंधित प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी येथील व्यावसायिकांची मागणी आहे.
रस्ता काम करताना विद्युत साहित्य नादुरुस्त
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भूमिगत विद्युत वाहिन्या घालण्यात आल्या आहेत. रस्ताकाम करताना बऱयाच ठिकाणच्या विद्युत वाहिन्या नादुरुस्त झाल्या आहेत. वास्तविक रस्ताकाम करणाऱया ठेकेदाराला विद्युत वाहिन्या घातल्याची कल्पना देणे गरजेचे होते. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आधीच कोरोनामुळे व्यवसायात मंदी आली आहे. यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न व्यावसायिक करत आहेत. मात्र याकडे प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप व्यावसायिकांमधून होत आहे.
गणेश मंदिर परिसरात
महिन्याभरापासून वीजपुरवठा खंडित
धान्य बाजारमधील गणेश मंदिर परिसरातील विद्युत पुरवठा खंडित होऊन महिना लोटला तरी तो सुरळीत करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे याबाबत प्रशासनाकडे वारंवार कळवूनसुद्धा याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप क्यापारी बांधवांकडून होत आहे. यामुळे व्यापाऱयांची गैरसोय होत आहे.
गणेश मंदिर परिसरातील रस्ता करताना वीज वाहिन्यांची दुरुस्ती करणे गरजेचे होते. मात्र दुरुस्ती न केल्यामुळे गैरसोय होत आहे.
यावर्षीची दिवाळी गेली अंधारात
बाजार समितीमधील अनेक ठिकाणचे पथदीप नादुरुस्त झाले आहेत. तर काही ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत नसल्याने पथदीप बंद आहेत. यामुळे रात्रीच्यावेळी सर्वत्र अंधार पसरलेला असतो. यंदा या परिसरातील व्यावसायिकांना दीपावली आंधारातच साजरी करावी लागली.
चोरीच्या प्रमाणात वाढ
बहुतांश ठिकाणचे पथदीप बंद असल्याने याचा फायदा चोरटय़ांनी घेतला. यावर्षी कांदा, बटाटय़ाचे दर गगणाला भिडले आहेत. त्यामुळे कांदा, बटाटा चोरीचे प्रमाण वाढले आहे. याचा फटका व्यापारी वर्गाला बसत आहे.
अनैतिक धंद्यांना ऊत
प्रशासनाने बाजार समितीच्या उत्तरकडून प्रवेशद्वार उभारले आहे. हे प्रवेशद्वारातील रस्ते करून जवळपास चार महिन्याच्या कालावधी लोटला. परंतु याठिकाणी पथदीपचे काम अद्याप करण्यात आले नाही. याचाच गैरफायदा अनैतिक धंदे, मद्यपान करणारे घेत आहेत. मद्याच्या नशेमध्ये बऱयाच भागात रस्त्यावर दारूच्या बाटल्या फोडण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. अंधारात फोडलेल्या बाटल्यांचा अंदाज येत नसल्याने वाहने पंक्चर होण्याच्या घटना वाढल्या आहेत. याचा मोठा फटका जनावरांची व्यवसाय करणाऱया वाहन चालकांना व शेतकऱयांना बसत आहे. काही शेतकरी बांधवांना काचा लागून जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत.









