जगभरात कोविड-19 साथी (एपिडेमिक) बरोबर माहितीच्या महापुराची स्थिती (इन्फोडेमिक) देखील उद्भवली. आपणही त्यातून सुटलो नाही. आपल्याकडे जवळपास 75 कोटीहून अधिक लोकांकडे ‘स्मार्ट फोन’ आहेत. 2010-2020 या दशकात माहिती-तंत्रज्ञानाच्या वेगाने संवादाची गती विलक्षण वाढली. तितक्मया वेगाने संवाद समजेची जडण-घडण मात्र झाली नाही. अनेकांचे मोबाईल ‘व्हॉट्सअप’ वर आलेल्या ‘फॉरवर्ड्स’ने ओसंडून वाहत असतात. ‘इन्फोडेमिक’ हे आरोग्य आपत्कालीन स्थितीत धोकादायक ठरू शकते, हे गेल्या वर्षभरातील कोरोना संक्रमण काळात संपूर्ण जगाने अनुभवले आहे.
कोरोना संक्रमणाच्या सुरुवातीच्या काळात सर्व प्रकारची माध्यमे अनेक प्रकारच्या माहितीने ओतप्रेत भरलेली होती. कोरोना विषाणुचा आकार, त्याचे भागावरील अस्तित्व, हवेतून पसरण्याची क्षमता, शरीराच्या विविध भागांवर त्याच्या संसर्गाने होणारा परिणाम, पाश्चात्य देशांमधील मृत्युंचे थैमान, तिथल्या भारतीयांनी लोकांना पाठवलेले संदेश, आयुर्वेद-होमियोपॅथी-ऍलोपॅथीची उपचार पद्धती अशी उठता-बसता केवळ कोरोनाविषयीचीच माहिती लोकांपर्यंत पोहोचत होती. परंतु यातील किती माहिती शास्त्रीय तथ्यांवर आधारित होती वा आहे, याची शहानिशा करण्याची तसदी घेताना फारसे कोणी दिसत नव्हते. अनेकजण आलेला संदेश पूर्णपणे न वाचताच आणि अधिक विचार न करताच पुढच्याला ‘फॉरवर्ड’ करीत असतात. यामधून अनेकदा अर्धवट आणि चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचते. त्यातून नकारात्मक अनारोग्यदायी वर्तन वाढीस लागते. घरगुती काढय़ांचे इतके संदेश ‘व्हॉट्सअप’ वरून फिरले की नंतर घशाच्या विकारात वाढ झाल्याचे एका अभ्यासातून पुढे आले होते. आरोग्य आपत्कालीन स्थितीत ‘इन्फोडेमिक’ मुळे ‘सकारात्मक आरोग्य वर्तना’वरच नव्हे तर सामाजिक वर्तनावरही परिणाम होताना दिसून आलेला आहे. अनेकदा माध्यमातून लोकांपर्यंत पोचलेली माहिती ही भीती, अस्थिरता, द्वेष, नैराश्य आदि नकारात्मक भावना वाढीस लावते. कोरोना संक्रमणाच्या सुरुवातीच्या काही महिन्यात मानसिक समस्यांमध्ये झालेली वाढ हे त्याचेच द्योतक होय. सामाजिक स्तरावर कोरोना संसर्ग झालेल्या कुटुंबीयांवर ठपका (स्टिगमा) ठेवणे, त्यांना बहिष्कृत करणे अशा दृश्य-अदृश्य भेदभावाच्या वर्तणुकीचा अनुभव काहींना नक्कीच आलेला असेल. या काळात कौटुंबिक हिंसाचारात वाढ झाल्याचे जागतिक अभ्यासदेखील सांगतात.
आपत्ती काळात ‘माहिती’ ही विषाणुपेक्षाही अधिक वेगाने आणि पटीने पसरत असते. अशा प्रसंगी लोकांपर्यंत अचूक वेळी विश्वासार्ह माहिती पोचवणे गरजेचे असते. कोरोना संक्रमण काळात याची तीव्रतेने जाणीव झाल्याने ‘जागतिक आरोग्य संघटने’ने ‘साथीच्या आजारांसाठी माहितीचे कार्यजाळे’ (इन्फर्मेशन नेटवर्क फॉर एपिडेमिक्स) ची स्थापना केली. कोविड-19 विषाणुविषयी पुराव्याअंती सिद्ध झालेली माहिती लोकांपर्यंत पोचवणे आणि चुकीच्या माहितीचा, दंतकथांचा, अफवांचा मागोवा घेणे यासाठी हे नेटवर्क काम करते. त्याचबरोबर माहितीच्या महापुराचे व्यवस्थापन करण्यासाठी ‘जागतिक आरोग्य संघटने’ने ‘ईअर्स’ (अर्ली आर्टिफिशिअल इंटलिजन्स सपोर्टेड रिस्पॉन्स विथ सोशल लिसनिंग) नावाचा मंच तयार केला. ज्यामध्ये विविध देशांमध्ये वा भाषांमध्ये लोक सामाजिक माध्यमांवर कोविड-19 संक्रमणाच्या स्थितीत काय प्रतिक्रिया देत आहेत याचा तत्काळ धावता आढावा आरोग्य धोरणकर्त्यांना मिळेल अशी व्यवस्था केली गेली. यासोबतच तंत्रज्ञानाची मदत, घेत माहितीच्या महापुराचे व्यवस्थापन व्हावे याकरिता ‘जागतिक आरोग्य संघटने’ने 30 जून ते 16 जुलै 2020 या काळात पहिली ‘इन्फोडियोमोलॉजी कॉन्फरन्स’ घेतली होती. या परिषदेसाठी 35 देशातून नानाविध 20 अभ्यास शाखातील, शंभरहून अधिक तज्ञ उपस्थित होते. सार्वजनिक आरोग्य संशोधनाच्या दृष्टीने माहितीचा महापूर समजून घेणे, त्याचे आकलन करणे आणि त्यास प्रतिसाद देणे या गोष्टीचे महत्त्व सदर परिषदेत अधोरेखीत करण्यात आले होते. अनेकदा चुकीची वा अर्धवट माहिती लोकांपर्यंत पोचल्याने नागरिकांचा व्यवस्थेवरील, शासकतेवरील विश्वास डळमळीत होतो. लोकांना ‘सकारात्मक आरोग्य वर्तना’कडे नेण्यासाठी त्यांच्या मनातील गोंधळ दूर करून विश्वास संपादन करणे आवश्यक असते. लोकांपर्यंत पोचलेली साधी, सरळ, सोपी शास्त्रीय माहिती आपत्ती निवारक यंत्रणांना पूर्ण क्षमतेने काम करण्यास सहाय्यक ठरते. विसाव्या आणि एकविसाव्या शतकात जगाने अनेक आरोग्य आपत्तींचा सामना केलेला आहे. भविष्यात आरोग्य आपत्तींचा सामना करण्यासाठी सार्वजनिक आरोग्याचा पाया मजबूत करतानाच, ‘तथ्यांवर आधारित शास्त्रीय माहितीचे भान’ लोकांमध्ये आणण्याकरिता आपल्याला संघटित प्रयत्न करावे लागतील. एखादी गोष्ट शांतपणे ऐकून घेणे, समजून घेणे यामध्ये आपण अनेकदा कमी पडतो. कोरोना काळात परप्रांतियांची रेल्वे स्थानकावर झालेली गर्दी हे त्याचेच द्योतक होते. गर्दीच्या ठिकाणी ओढवलेला अपघात प्रसंग असो वा नैसर्गिक आपत्ती असो भीती, गोंधळ, चेंगराचेंगरी यामुळे जीवित हानीचे प्रमाण वाढल्याचे याआधीच्या अनेक प्रसंगातून समोर आले आहे. विषाणुंचे संक्रमण, नैसर्गिक आपत्ती या आपल्यासाठी पुढेही राहतील. अशा प्रसंगी योग्य वेळी, योग्य व्यक्तीकडून, योग्य माध्यमातून, योग्य संदेश गेल्यास अनेक प्रकारचे नुकसान टाळता येऊ शकते. त्याकरिता माहितीच्या महापुराचे व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. त्याची पायाभरणी ही ‘संयम’ आणि ‘तटस्थता’ या गुणांनी झाली पाहिजे. आय.ई.सी. (इन्फर्मेशन, एज्युकेशन आणि कम्युनिकेशन) अंतर्गत माहिती व्यवस्थापनाविषयी विस्तृत आणि सखोल कार्यक्रम राबविला गेला पाहिजे. माहितीची सत्यता पडताळून पाहण्याची सवय रुजण्यासाठी आपल्याला सजग ‘नागरिक शास्त्र’ जगावे लागेल. जेणेकरून अनेक माध्यमातून मिळालेली माहिती विविध शास्त्रीय कसोटय़ांवर तपासून, वस्तुनि÷-शास्त्रीय माहितीचे आकलन करण्यास प्रत्येक व्यक्ती सक्षम होईल. अशा माहितीच्या अंगीकाराची आणि स्वीकाराची समज ‘सकारात्मक आरोग्य वर्तन’ घडवून आणण्यास सहाय्यक ठरेल. साथरोग (एपिडेमिक), महामारी (पेंडॅमिक) च्या प्रबंधन आराखडय़ात इथून पुढे आपल्याला इन्फोडेमिक व्यवस्थापनाचाही समावेश करावा लागेल. केवळ प्रसंगानुरुप त्या त्या विषयाशी संबंधित कायद्यामध्ये बदल करून स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणता येणार नाही. आपल्याकडील मोठी लोकसंख्या, आरोग्य व्यवस्थेतील कर्मचाऱयांचा तुटवडा, आरोग्य सुविधांच्या कमतरता आदि गोष्टींचा विचार करता, ‘योग्य आरोग्य संवाद’ घडवून ‘सकारात्मक आरोग्य वर्तन’ आणण्याकरिता लोकांमध्ये ‘इन्फोडेमिक साक्षरता’ आणावी लागेल.








