ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रातील अनेक पोलिसांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यातच आता एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील दोन दिवसांपासून त्यांना ताप येत होता. त्यामूळे त्यांची कोरोना टेस्ट केली असता त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. दया नायक सध्या एटीएसमध्ये नियुक्त आहेत. दया नायक एटीएसच्या जुहू युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत.
दया नायक यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आलेल्या धमक्यांच्या तपासाचे काम होते. या तपासासाठी त्यांना मुंबई बाहेर आणि राज्याच्या बाहेरही जावे लागले होते. ते सतत आरोपीच्या शोधात आणि आरोपींच्या संपर्कात होते. याच काळात त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, दया नायक हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सध्या होम क्वारंटाइनमध्ये आहेत.