प्रतिनिधी/ बेळगाव
जाधवनगर येथील एनसीसी परेड मैदानावर 25 कर्नाटक बटालियन एनसीसी तर्फे सुरू असलेल्या वार्षिक प्रशिक्षण शिबीर व प्रजासत्ताक दिन पथसंचलन निवड शिबीराचा पुरस्कार वितरण व समारोप समारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला एनसीसीचे अधिकारी कर्नल व्ही. के. जाधव उपस्थित होते.
25 कर्नाटक बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल राजीव सहानी यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. 10 दिवसांच्या या प्रशिक्षण शिबिरामध्ये बेळगाव, हावेरी, धारवाड, हुबळी व गोवा येथील 400 छात्रांनी आपला सहभाग नोंदविला. या प्रशिक्षण शिबिरामध्ये छात्रांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱया पथसंचलनात सहभागी होण्यासाठी निवड करण्यात येणाऱया छात्रांना प्रशिक्षण देण्यात आले. विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
कर्नल राजीव सहानी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. विजेत्या छात्रांचे अभिनंदन करून बेंगळूर येथे होणाऱया पुढील शिबिरासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कॅप्टन हेमगीरीमठ यांनी अहवाल वाचन केले. यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. पंकजा अमरगोळ यांनी आभार मानले. एनसीसी गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी विविध एनसीसी अधिकारी उपस्थित होते.









