प्रतिनिधी / मुंबई
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणात नवनवे धक्कादायक खुलासे बाहरे पडत आहेत. सुशांतच्या मृत्यूप्रकरणाचा तपास सुरू असताना या प्रकरणाशी संबंधी ड्रग्ज रॅकेटमध्ये बॉलीवूडमधील दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान या बडय़ा अभिनेत्रींच्या नावाचा पर्दाफाश एनसीबीने केला आहे. या चौघींना समन्स बजावले असून, एनसीबीच्या रडावर आता बॉलीवूडमधील तब्बल 50 सेलिब्रिटी आहेत. तसेच टीव्ही इंडस्ट्रीमधीलही काही कलाकार निशाण्यावर आहेत. एनसीबीने चौकशीसाठी बोलावल्यानंतर दीपिका आणि सारा अली या गोव्याहून मुंबईत रवाना झाल्या आहेत. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांनी दीपिकाच्या घराबाहेर बंदोबस्त वाढविला आहे.
दीपिका पदुकोणची आज, शुक्रवारी तर साराची शनिवारी चौकशी होणार आहे. तसेच या सर्वांची नावे जया साहाच्या चौकशीतून समोर आल्यानंतर जयाला अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आधीच रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक आणि ड्रग्ज पेडलर्सना अटक केली आहे. याप्रकरणी एनसीबीने दोन एफआयआर दाखल केल्या असून 50 सेलिब्रिटींची यादीही तयार केली आहे. एनसीबीने ही यादी ड्रग पेडलर्सच्या चौकशीनंतर तयार केली आहे. एनसीबीने करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन टीममधील दिग्दर्शक क्षितीज प्रसाद याला समन्स पाठवले आहे. त्याची आज शुक्रवारी दीपिका आणि करिश्मा प्रकाश यांच्याबरोबर चौकशी होणार आहे.
दरम्यान, एनसीबीने सुशांत प्रकरणात दोन एफआयआर दाखल केले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत एनसीबीने रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती आणि अमली पदार्थांची देवाण-घेवाण करणाऱया ड्रग्ज डीलरला अटक केली आहे. आता एनसीबीच्या रडारवर अनेक ए ग्रेट अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक आणि बी ग्रेड सिनेमांच्या निर्मात्यांची नावे सामील आहेत. या सर्वांवरच ड्रग्ज घेण्याचा, ड्रग्ज पार्टीचे आयोजन करणे, ड्रग्ज पेडलर्सकडून अमली पदार्थ विकत घेणे असे आरोप आहेत. गुरुवारी एनसीबीने रकुलला चौकशीसाठी बोलाविले होते. मात्र आपल्याला समन्स न मिळाल्याचे कारण सांगून ती एनसीबी कार्यालयात गेली नाही.
कोण आहे दिग्दर्शक क्षितीज प्रसाद
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये क्षितीज हा दिग्दर्शक म्हणून काम करतो. याआधी त्याने बालाजी टेलिफिल्ममध्येही काम केले होते. क्षितीजने स्पार्क या नावाची कंपनी स्थापन केली असून, या कंपनीअंतर्गत त्याने ‘डॉली किट्टे के चमकते सितारे’ आणि ‘प्रसाद’ या चित्रपटांची निर्मिती केली आहे.
मी ड्रग्ज घेतले नाही : दिया
अभिनेत्री दिया मिर्झालाही या प्रकरणात समन्स बजावण्यात आले आहे. मात्र मी कधीही ड्रग्जचे सेवन केलेले नाही, असे तिने स्पष्ट सांगितले आहे. प्रसारमाध्यमांमधून माझ्यावर होणारे थेट आरोप माझी प्रतिमा मलीन करत आहेत. माझ्या करिअरलाही धोका पोहोचवित आहेत. मी मेहनतीने करिअर घडवले आहे. माझ्या आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या ड्रग्जचे सेवन केलेले नाही आणि जवळही बाळगले नाहीत. मी भारताची नागरिक या नात्याने कायद्याचा आदर करते, असे तिने ट्विट केले आहे.








