नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताच्या नौदलाची युद्धनौका आयएनएस खुकरी निवृत्त करण्यात आली आहे. ही भारताची प्रथम स्वदेशनिर्मित युद्धनौका आहे. तब्बल 32 वर्षांच्या सलग सेवेनंतर आता तिला विश्रांती देण्यात आल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली. या नौकेला गुरुवारी एका समारंभात विशाखापट्टणम येथे निरोप देण्यात आला. ही नौका भारतीय भूसेनेच्या गुरखा ब्रिगेडशी संलग्न होती. तिची निर्मिती माझगाव नौदल केंद्रात करण्यात आली होती. या नौकेने पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही सागरतटांवर कार्य केलेले आहे. तिच्या कार्यरत आयुष्यात तिने 6 लाख 44 हजार 897 सागरी मैलांचा प्रवास केला असून हे अंतर 30 वेळा पृथ्वीप्रदक्षिणा केल्यासारखे आहे, अशीही माहिती नौदलाकडून देण्यात आली.









