पीएसआय नेमणूक गैरव्यवहार प्रकरणी कारवाई
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात 545 पोलीस उपनिरीक्षक पदांच्या (पीएसआय) नेमणुकीत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणामुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणात अंतर्गत सुरक्षा विभागात एडीजीपी म्हणून सेवा बजावणारे आयएएस अधिकारी अमृत पॉल यांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी चौकशीसाठी हजर झाल्यानंतर त्यांना सीआयडीने अटक केली आहे. दरम्यान, अमृत पॉल यांना निलंबित करण्यात आले आहे. राज्यात प्रथमच एडीजीपी दर्जाच्या अधिकाऱयाला अटक करण्यात आली आहे.
पोलीस उपनिरीक्षक पदांच्या परीक्षेतील 25 उमेदवारांशी प्रत्येकी 30 लाख रुपयांचे ‘डील’ केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात अटकेत असलेल्या 45 हून अधिक जणांची चौकशी केल्यानंतर अमृत पॉल यांचा गैरव्यवहारात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. तीन वेळा चौकशीला हजर झालेले पॉल सोमवारी चौथ्यांदा चौकशीला हजर झाले असता अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता 10 दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली आहे.
प्रथमच वरिष्ठ अधिकाऱयाला अटक
पोलीस उपनिरीक्षक नेमणूक प्रकरणात प्रथमच आयपीएस अधिकारी आणि एडीजीपी दर्जाच्या अधिकाऱयाला अटक झाली आहे. या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी श्रीधर याच्या घरावर छापा टाकल्यानंतर 1 कोटी रुपये आढळून आले होते. नेमणूक विभागाच्या स्ट्राँग रुममध्येच ओएमआर शीटमध्ये फेरफार करण्यात आल्याचे सीआयडी तपासातून निष्पन्न झाले होते. दरम्यान, पोलीस आयुक्तपदाच्या शर्यतीत असणारे पोलीस नेमणूक विभागाचे एडीजीपी अमृत पॉल यांची अंतर्गत सुरक्षा विभागात बदली करण्यात आली होती. सुरुवातीला त्यांच्याविरोधात कोणतेही सबळ पुरावे उपलब्ध झाले नव्हते. डीवायएसपी शांतकुमार यांच्या अटकेनंतर या प्रकरणातील आणखी नावे समोर आाली. यापूर्वी अटक करण्यात आलेले आरोपी शांतकुमार यांच्याशी सातत्याने संपर्कात झाल्याचा तपास सीआयडीने केला होता.
सीआयडीला पूर्ण स्वातंत्र्य दिल्यानेच अटक
पीएसआय नेमणूक गैरव्यवहार प्रकरणात सीआयडीला चौकशी करण्यास पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आल्यानेच आरोप असणारे एडीजीपी अमृत पॉल यांना अटक झाली आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली आहे. साक्ष-पुराव्यांच्या आधारे सीआयडीचे अधिकारी कारवाई करत आहेत. प्रकरणात कितीही प्रभावी व्यक्तीचा सहभाग आढळून आला तरी कारवाई केली जाईल. एडीजीपी अधिकाऱयाच्या अटकेमुळे सरकारची कोंडी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यापूर्वी पोलीस खात्यातील नेमणूक गैरव्यवहाराची चौकशीच झाली नव्हती. मात्र, आपल्या सरकारकडून कोणताही मुलाहिजा न ठेवता निःपक्षपातीपणे तपास करून आरोपींना अटक केली जात आहे, असेही ते म्हणाले.









