वृत्तसंस्था/ मेलबर्न
कोव्हिड 19 च्या धास्तीमुळे अनेक स्पर्धा टाळल्याने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गीओसला त्याचा फटका बसला असून त्याची जागतिक मानांकनात 46 व्या स्थानावर घसरण झाली आहे. यामुळे पुढील महिन्यात होणाऱया एटीपी चषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन संघातून त्याला वगळण्यात आले आहे. गेले 11 महिने तो एटीपी टूरमधील स्पर्धेत सहभागी झालेला नाही.
25 वर्षीय किर्गीओसने गेल्या वर्षी फेब्रुवारीत ऍकापुल्कोमध्ये शेवटचा स्पर्धात्मक सामना खेळला होता. कोरोनाच्या ब्रेकनंतर एटीपी सर्किटमधील स्पर्धांना युरोप व उत्तर अमेरिकेत पुन्हा सुरुवात करण्यात आली होती. पण किर्गीओसने त्यात भाग न घेता घरी राहण्याचा निर्णय घेतला होता. एटीपी चषक स्पर्धेसाठी प्रत्येक देशाला आपल्या आघाडीच्या दोन खेळाडूंना निवडावे लागते. यानुसार ऑस्ट्रेलियाने ऍलेक्स डी मिनॉर व जॉन मिलमन यांची या स्पर्धेसाठी निवड केली आहे. ते अनुक्रमे 23 व 38 व्या क्रमांकावर आहेत. या दोघांव्यतिरिक्त जॉन पीयर्स व ल्युक सेव्हिले यांची दुहेरीसाठी निवड करण्यात आली आहे. मागील वर्षापासून एटीपी चषक स्पर्धेची सुरुवात करण्यात आली असून पहिल्याच स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. यावेळची स्पर्धा मेलबर्नमध्ये 1 ते 5 फेब्रुवारी या कालावधीत होणार असून त्यात जोकोविच व नदालही सहभागी होणार आहेत. त्याचा ड्रॉ 20 जानेवारी रोजी काढण्यात येणार आहे. याच कालावधीत होणाऱया एटीपी 250 स्पर्धेत किर्गीओसला खेळावे लागणार आहे.









