वृत्तसंस्था/ कोलकाता
अलीकडेच भारतीय फुटबॉल संघात पदार्पण केलेला डिफेंडर आशुतोष मेहताला आगामी आयएसएल मोसमात एटीके मोहन बागानने आपल्या संघात सामील करून घेतले आहे.
मेहतासाठी हा भावूक क्षण असणार आहे. कारण 2019-20 या मोसमात त्याने मोहन बागानतर्फे खेळताना आय लीगचे दुसरे जेतेपद मिळविले होते. 2016-17 मोसमात ऐजवाल एफसीकडून खेळताना त्याने पहिल्यांदा आय लीगचे जेतेपद मिळविले होते. गेल्या मोसमात मोहन बागान संघाचे एटीकेमध्ये विलीनीकरण झाले होते. त्यावेळी मेहताला कायम ठेवण्यात आले नव्हते. त्यामुळे तो नॉर्थ ईस्ट युनायटेडकडून खेळला आणि आयएसएलमध्ये त्याच्या संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. त्याच्या कामगिरीची दखल घेत त्याला राष्ट्रीय संघात स्थान दिले गेले आणि ओमानविरुद्धच्या मैत्रिपूर्ण सामन्यात त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. एटीके मोहन बागानचे प्रशिक्षक हबस यांनीही त्याच्या खेळाचे कौतुक केले असून त्याच्याकडून येत्या मोसमात खूप अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.









