क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
एफसी गोवाचा 2-1 गोलफरकाने पराभव करून एटीके मोहन बागानने आयएसएल फुटबॉल स्पर्धेत आपला चौथा विजय साकारला. काल हा सामना फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर खेळविण्यात आला. एटीके मोहन बागानसाठी लिस्टन कुलासो व रॉय कृष्णाने तर एफसी गोवा संघाचा एकमेव गोल जॉर्गे ऑर्तिजने नोंदविला.
या विजयाने एटीकेला तीन गुण प्राप्त झाले. आठव्या सामन्यांतून त्यांचा हा चौथा विजय. दोन बरोबरी व दोन पराभवाने त्यांचे आता 14 गुण झाले असून ते आता तिसऱया स्थानावर गेले आहेत. आठव्या सामन्यांतून एफसी गोवाचा हा चौथा पराभव. प्रत्येकी दोन विजय व पराभवाने त्यांचे 8 गुण आणि आठवे स्थान अजुनही कायम आहे.
सामन्याच्या पहिल्या दहा मिनिटांच्या खेळात एफसी गोवाच्या मोहम्मद नेमील आणि देवेंद्र मुरगावकर यांचे गोल करण्याचे यत्न थोडक्यात हुकले. 23व्या मिनिटाला एटीके मोहन बागानने आघाडी घेणारा गोल केला. कालच्या सामन्यात नेहमीच धोकादायक वाटणाऱया लिस्टन कुलासोने हा गोल दिपक टांग्रीच्या पासवर केला. त्याच्या जबरदस्त फटक्यावर एफसी गोवाचा गोलरक्षक धीरज सिंग काहीच करू शकला नाही.
त्यानंतर 30व्या मिनिटाला एटीके मोहन बागानचा गोलरक्षक अमरिंदर सिंगच्या उत्कृष्ट गोलरक्षणामुळे एफसी गोवा संघाची गोल बाद करण्याची संधी हुकली. यावेळी जॉर्गे ऑर्तिजने हाणलेला फ्रिकीक अमरिंदरने झेपावत अडविला व संघावर होणारा संभाव्य गोल टाळला. मध्यंतराच्या ठोक्याला एटीकेच्या मानवीर सिंगने संघाची आघाडी वाढविण्याची संधी वाया घालविली. दुसऱया सत्रात 56व्या मिनिटाला एटीके मोहन बागानने आपली आघाडी दोन गोलांनी वाढविली. हय़ुगो बूमोसच्या पासवर रॉय कृष्णाने एफसी गोवाचा गोलरक्षक धीरज सिंगला भेदले व चेंडूला नेटमध्ये टाकले. लढतीच्या 81व्या मिनिटाला एफसी गोवाने गोल केला. प्रतिस्पर्धी गोलरक्षक अमरिंदर सिंगच्या चुकीचा फायदा घेत जॉर्गे ऑर्तिजने हा गोल केला.









