दोन गोलांच्या पिछाडीवरून 3-2 गोलानी मात, रॉय कृष्णाचे 2, मार्सेलिनोचा 1 गोल
क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
साठ मिनिटांपर्यंत दोन गोलानी पिछाडीवर असलेल्या एटीके मोहन बागान संघाने शेवटच्या अर्ध्या तासाच्या खेळावर प्रभुत्व गाजवून तीन गोल नोंदविले आणि केरळ ब्लास्टर्स संघाचा 3-2 गोलानी पराभव केला. आयएसएल फुटबॉल स्पर्धेतील हा सामना फातोर्डाच्या नेहरु स्टेडियमवर खेळविण्यात आला.
सामनावीर ठरलेल्या रॉय कृष्णाने एटीकेसाठी दोन तर एक गोल मार्सेलिनो परेराने केला. पराभूत केरळ ब्लास्टर्सचे गोल गॅरी हूपर आणि कॉस्ता न्हामोयनेसूने केला. विजयाच्या तीन गुणांनी एटीकेचे आता 14 सामन्यांतून 27 गुण झाले व त्यांचे दुसरे स्थान कायम राहिले. केरळ ब्लास्टर्सचे आता 15 सामन्यांतून 15 गुण झाले असून ते नवव्या स्थानावर आहेत.
सामन्याच्या सहाव्याच मिनिटाला केरळ ब्लास्टर्सची आघाडी घेण्याची संधी सहाल अब्दुल समदने एक कमजोर फटका एटीके मोहन बागानचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्यच्या सरळ हातात मारून वाया घालविली. त्यानंतर गॅरी हूपरने एक अफलातून गोल करून ब्लास्टर्सला आघाडीवर नेले. आयएसएल फुटबॉल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमातील हा एक अव्वल गोल ठरावा. 14 व्या मिनिटाला संदीप सिंगने आपल्या उजव्या बगलेतून दिलेल्या पासवर, प्रथम हूपरने चेस्ट करीत चेंडूवर नियंत्रण ठेवले आणि 40 यार्डवरून शक्तीशाली फटका हाणत गोल अडविण्याची अरिंदम भट्टाचार्यला कोणतीही संधी दिली नाही.
पहिल्या सत्रात जास्त वेळ केरळ ब्लास्टर्सकडेच चेंडू होता. 21 व्या मिनिटाला गॅरी हूपरने दिलेल्या पासवर जॉर्डन मरे याने हाणलेला फटका एटीके गोलच्या बारवरून गेला. त्यानंतर दोन वेळा एटीके मोहन बागान संघाला गोल बाद करण्याची संधी मिळाली होती. प्रथम मार्सेलिनो परेराच्या कॉर्नरवर रॉय कृष्णाचा हेडर दिशाहीन ठरला तर लगेच रॉय कृष्णाने हाणलेला फटका केरळ ब्लास्टर्सचा गोलरक्षक आल्बिनो गोम्सने तत्परतेने अडविला.
पहिल्या सत्रात 30व्या मिनिटाला जॉर्डन मरेचा फटका अरिंदमने अडविल्याने केरळ ब्लास्टर्सची आघाडी मध्यंतरापर्यंत एक गोलापर्यंत मर्यादीत राहिली.
दुसऱया सत्रात पंधरा मिनिटात तीन गोलांची नोंद झाली. प्रथम 51 व्या मिनिटाला केरळ ब्लास्टर्स संघाने दुसरा गोल केला आणि आघाडी दोन गोलांनी वाढविली. कॉस्ता न्हामोयनेसूने हा गोल केला. त्यानंतर रॉय कृष्णाची गोल करण्याची संधी ब्लास्टर्सचा गोलरक्षक आल्बिनो गोम्सने उत्कृष्ट गोलरक्षण करून उधळून लावली. एटीकेचा ऑन-लोनवर आलेल्या ब्राझिलीयन मार्सेलो परेराने मानवीर सिंगच्या पासवर आल्बिनोला भेदले आणि गोल केला.
65 व्या मिनिटाला रॉय कृष्णाने मिळालेल्या पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर केले आणि दोन गोलांच्या पिछाडीवरून सामना 2-2 असा बरोबरीत आणला. एटीके मोहन बागानच्या विजयी गोलाची नोंद 87व्या मिनिटाला रॉय कृष्णाने केली. बचावफळीतील एक खेळाडूला व नंतर गोलरक्षक आल्बिनो गोम्सला वेगळय़ा कोंडत पकडून त्याने चेडू जाळीत टोलविला. त्याचे आता यंदाच्या स्पर्धेत 9 गोल झाले. एफसी गोवाच्या इगोर आंगुलोशी बरोबरी करण्यासाठी त्याला आता केवळ एक गोल आवश्यक आहे.









