प्रतिनिधी / खेड
एकीकडे ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. या पाठोपाठच एटीएम सेंटरमध्ये गेल्यानंतर एटीएमची अदलाबदल करून फसवणूक करण्याचे प्रमाण देखील वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी एटीएम सेंटरमध्ये गेल्यानंतर सतर्कता बाळगूनच रक्कम काढण्याची प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन येथील पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी केले आहे.
कोरोनाच्या संकटामुळे गुन्हेगारी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस असल्याची बतावणी करत लुबाडणूकीचे प्रकार करणे, अंगावरील दागिने पळवून नेणे, अंधाराचा फायदा घेवून घरफोड्या करणे आदी गुन्हे घडण्याची दाट शक्यता आहे. याप्रकारचे गुन्हे घडणार नाहीत, याची पुरेपूर खबरदारी घेवून पोलीस कर्तव्य बजावत आहेतच नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
यापाठोपाठच एटीएम सेंटरमध्ये गेल्यानंतरही दक्षता बाळगण्याची आवश्यकता आहे. पैसे काढण्यासाठी कोणत्याही अनोळखी इसमाकडे एटीएम कार्ड देवू नये. तसेच एटीएमचा पिनकोड देखील कोणत्याही अनोळखी इसमास सांगू नये. एटीएम सेंटरमध्ये गेल्यानंतर एकावेळी एकच व्यक्ती पैसे काढेल याची काळजी घ्यायला हवी. आपल्या एटीएमचा पिनकोड कुठलीही व्यक्ती लपूनछपून बघत नाही ना ? याची खबरदारी घेण्याचे आवाहनही केले आहे.
मुलींच्या पालकांनी जागरूक रहावे
अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या दोन घटना घडल्या आहेत. याप्रकरणी आरोपींना अटकही करण्यात आले आहे. गुन्हेगारांना कायद्यानुसार योग्य ते कडक शासन होईलच. मात्र, पालकांनी देखील जागरूक राहण्याची नितांत आवश्यकता आहे. घरात एकटी असणाऱ्या मुलींना लगतच्या शेजाऱ्यांकडे देखरेखेखाली ठेवायला हवे. मुली अथवा महिलांना कोणी त्रास देत असेल, पाठलाग करत असेल तर तातडीने पोलीस स्थानक अथवा पोलीस नियंत्रण कक्षात तातडीने माहिती द्या, असे आवाहनही पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी केले आहे.









