अमेरिकेत कोरोना महामारी संकट : देशातील वाढत्या बेरोजगारीमुळे निर्णय शक्य : डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडून विचार सुरू
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमरिकेत कोरोना महामारीमुळे बेरोजगारी दर अचानक वाढला आहे. याचा प्रभाव कमी करणे आणि अमेरिकेच्या नागरिकांचा रोजगार वाचविण्यासाठी ट्रम्प प्रशासन एच-1बी व्हिसासह अनेक रोजगार व्हिसांना निलंबित करण्याचा विचार करत आहे. हा व्हिसा स्थगित करण्यात आल्यास भारताच्या तंत्रज्ञांवर याचा मोठा परिणाम होणार आहे.
व्हिसाला ऑक्टोबरपासून सुरू होणाऱया नव्या आर्थिक वर्षात स्थगित केले जाऊ शकते. या कालावधीत अमेरिकेच्या बाहेरून कुणीही एच-1बी व्हिसाच्या माध्यमातून काम करण्यासाठी येऊ शकणार नाही. परंतु पूर्वीपासून राहत असलेल्या व्हिसाधारकांवर याचा कुठलाच प्रभाव पडणार नाही. यासंबंधी अद्याप कुठलाच अंतिम निर्णय झालेला नाही. प्रशासन अनेक प्रकारच्या प्रस्तावांवर विचार करत असल्याचे व्हाइट हाउसच्या प्रवक्त्या होगन गिडली यांनी सांगितले आहे.
भारतावर पडणार प्रभाव
एच-2बी व्हिसा वगळता अन्य सर्व व्हिसा स्थगित करण्यात आल्यास भारतीयांवर प्रभाव पडणार आहे. एच-2बी व्हिसा विशेषकरून मेक्सिकोच्या स्थलांतरित मजुरांना उपयुक्त ठतो. अमेरिकेत दरवर्षी 10 लाख कर्मचारी अन्य देशांमधून दाखल होत असतात. देशात बेरोजगारीचा दर अधिक असल्याने या कर्मचाऱयांना व्हिसा देणे योग्य नसल्याचे अमेरिकेच्या खासदारांनी म्हटले आहे.
एच-1बी व्हिसा
एच-1बी व्हिसा बिगर प्रवासी व्हिसा आहे. अमेरिकेच्या कंपन्या अन्य देशांमधील तंत्रज्ञांना नियुक्त करतात. नियुक्तीनंतर सरकारकडून या कर्मचाऱयांसाठी एच-1बी व्हिसा मागितला जातो. अमेरिकेच्या बहुतांश माहिती-तंत्रज्ञान कंपन्या दरवर्षी भारत आणि चीनसारख्या देशांमधून लाखो कर्मचाऱयांची नियुक्ती या व्हिसाच्या माध्यमातून करतात. नियमानुसार कुठल्याही एच-1बी व्हिसाधारकाच्या कंपनीने त्याच्यासोबतचा करार संपुष्टात आणल्यास संबंधिताला 60 दिवसांमध्ये नव्या कंपनीत नोकरी शोधावी लागते. भारतीय माहिती तंत्रज्ञ हा 60 दिवसांच कालावधी वाढवून 180 दिवसांचा करण्याची मागणी करत आहेत.









