वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
माहिती तंत्रज्ञान सेवा देणारी कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीसने आगामी पाच वर्षांमध्ये अमेरिकेत 12,000 नोकऱया देण्याची योजना आखली असल्याची माहिती आहे. कंपनीने नुकतीच या संदर्भात माहिती दिली आहे.
अमेरिकेत कंपनी आपल्या करिअर आणि प्रशिक्षण कार्यक्रमासह आगामी 36 महिन्यांमध्ये 2,000 पेक्षा अधिक उमेदवारांची नियुक्ती करणार असल्याचे सांगितले आहे. एचसीएल टेक्नॉलॉजीसने अमेरिकेत तब्बल 12,000 जणांना रोजगार देण्याची घोषणा केली आहे.
1 लाख 87 हजार जणांना रोजगार
या घडीला एचसीएल टेक्नॉलॉजीस जागतिक स्तरावर 1 लाख 87 हजार जणांना रोजगार देत आहे. विदेशातील व्यवसायाला कंपनीला आता 32 वर्षे पूर्ण होत असून अधिकाधिक व्यवसाय विस्तार हेच धोरण एचसीएलचे असणार आहे.
उत्तम प्रशिक्षणाची सोय- सी. विजयकुमार
पुढच्या पिढीला नव तंत्रज्ञानाची योग्यपणे ओळख करून देताना त्यांच्यात नेतृत्वाची क्षमता निर्माण करण्याचे कार्य कंपनी करत असून याकरीता उत्तम प्रशिक्षण उमेदवारांना देत आहे. नोकरीच्या अनुषंगाने आवश्यक त्या कौशल्याविषयी मार्गदर्शन त्यांना दिले जात असल्याचे कंपनीचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालक सी. विजयकुमार यांनी म्हटले आहे.









