वृत्तसंस्था/ मुंबई
देशातील दोन दिग्गज वित्तीय कंपन्या एचडीएफसी बँक आणि गृहकर्ज वितरण क्षेत्रातील कंपनी एचडीएफसी लिमिटेड दोन्ही एकत्र येत आहेत. दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण निश्चित झाले आहे. एचडीएफसी बँकमध्ये एचडीएफसी लिमिटेडचा 41 टक्के इतका वाटा आहे. दोन्ही एचडीएफसी कंपन्या एकत्र आल्यानंतर शेअर बाजारात कंपनीचे बाजार भांडवल वाढून ती दुसरी मोठी कंपनी टीसीएसलाही मागे टाकू शकते, असे म्हटले जाते.
सदरच्या दोन्ही कंपन्यांचे एकत्रिकरण वा विलीनीकरण आर्थिक वर्ष 2024 मध्ये दुसऱया तिमाहीपर्यंत पूर्ण होऊ शकते. एचडीएफसीचे चेअरमन दीपक पारेख म्हणाले, की गेल्या काही काळात बिगर बँकिंग संस्था व बँका यांच्या नियमांमध्ये सारखेपणा आणण्याचा प्रयत्न झाला आहे. यामुळेच विलीनीकरणाचा विचार प्रत्यक्षात येऊ शकला आहे. या दोन्हींच्या विलीनीकरणानंतर गृहकर्जधारकांना विस्तारीत योजनेचा लाभ उठवता येणार आहे.
समभागांमध्ये उसळी
सदरच्या दोन्ही कंपन्यांच्या एकत्रिकरणाच्या बातमीनंतर शेअर बाजारात यांच्या समभागांमध्ये उसळी पाहायला मिळाली. सुरूवातीच्या सत्रात एचडीएफसी लिमिटेडचा समभाग 2.73 टक्केसह 565 रुपयांवर व्यवहार करत होता. एचडीएफसी बँकेचा समभाग 9.39 टक्के वाढीसह 1647 रुपयांवर व्यवहार करत होता.









