पोलीस होण्याचे स्वप्न अपघातामुळे भंगले : जिद्द-चिकाटीने डाव्या हाताने शिवणकामाचा केला सराव
मनीषा सुभेदार / बेळगाव
पोलीस होण्याचे स्वप्न त्यांनी लहानपणापासूनच उरापोटाशी जपले. खाकी वर्दीच्या आकर्षणामुळे पोलीस प्रवेश प्रक्रियेची परीक्षा देण्यासाठी धारवाडहून त्या येतात काय?, प्रवासातच ट्रकच्या धडकेने अपघात होऊन त्यांचा उजवा हात तुटतो काय? आणि त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर होतो काय? सारेच अकल्पीत. खरे तर सहन करण्यापलीकडचे. परंतु त्या खचल्या नाहीत. निराशेने काहीकाळ त्यांना ग्रासले. परंतु पुन्हा नव्या उमेदीने त्या उभ्या राहिल्या. इतकेच नव्हे तर डाव्या हाताने शिवणकाम करण्यास शिकल्या आणि त्यातून त्यांचे बुटीकही उभे राहिले.
हा रोमांचक तितकाच थरारक प्रवास करणाऱया आजच्या दुर्गा आहेत राजेश्वरी हिरेमठ. अपघातानंतर ज्या पद्धतीने त्या उभ्या राहिल्या, ते सारेच कौतुकास्पद पण इतर सर्व दिव्यांगांनी प्रेरणा घ्यावी असेच आहे.
राजेश्वरी यांचे शालेय शिक्षण वनिता विद्यालयामध्ये झाले. सरदार्स कॉलेजमधून त्यांनी टेलरिंगमध्ये अभ्यास पूर्ण केला. त्याचप्रमाणे ज्योती कॉलेजमध्ये बीएची पदवी घेतली. लहानपणापासून पोलीस दलात भरती व्हायचे, हे स्वप्न त्यांनी बाळगले आणि त्यासाठी सर्व तोपरी तयारी केली. पोलीस प्रक्रियेची परीक्षा देण्यासाठी त्या धारवाडला गेल्या. परत बसमधून येताना बंद असलेल्या खिडकीपाशी त्यांचा हात होता. वळणावर ट्रकने बसला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की काच फुटून ट्रकच्या धडकेने राजेश्वरी यांचा उजवा हात खांद्यापासून तुटला. हिरेबागेवाडीहून बेळगावला येईपर्यंत त्यांच्या भावाने तो तुटलेला हात तसाच समवेत बाळगला.
हात गमावल्याचे वास्तव मोठय़ा धीराने पचविले
राजेश्वरींना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखविण्यात आले. परंतु मध्यंतरी बराचवेळ गेल्याने हाताच्या शिरा निष्क्रिय झाल्या होत्या. आपला उजवा हात गेला हे वास्तव राजेश्वरी यांनी मोठय़ा धीराने पचविले. डॉक्टरांनी त्यांच्या खांद्यापासूनच्या भागावर शस्त्रक्रिया केली व 21 टाके घातले. केएलई हॉस्पिटलमधील प्लास्टिक सर्जन डॉ. राजेश पवार यांनी ही शस्त्रक्रिया अत्यंत कौशल्याने केली आहे, असे त्या सांगतात. कृत्रिम हात बसविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु त्यामुळे मानेवर परिणाम होऊ लागला. शेवटी हा नाद त्यांनी सोडून दिला.
या काळात आई अन्नपूर्णा, बहीण काशव्वा, भाऊ सदानंद या सर्वांनी राजेश्वरी यांना खूप धीर दिला. 8 वर्षे त्या बेंगळूर येथेच वास्तक्याला होत्या. दोन वर्षे त्यांना नैराश्येने ग्रासले. मात्र पुन्हा त्यांनी स्वतःचीच समजूत काढली आणि त्या बेळगावला परत आल्या. पूर्वी आईच्या समवेत त्या शिवणकाम करत असतं. फक्त एक हात गेला आहे पण मनगटातील ताकद आपण गमावणार नाही, असा निश्चय त्यांनी केला आणि डाव्या हाताने शिवणकाम करण्याचा सराव सुरू केला. दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर सराईतपणे त्यांचे हात कपडय़ावर टिपा मारू लागले.
साडय़ांमधून विविध पोषाख तयार करण्यात निपूण
हे करत असतानाच स्वतःचे बुटीक उभारण्याचे नवे स्वप्न त्यांनी पाहिले आणि ‘अग्रीम फॅशन’ हे बुटीक सुरू झाले. लॉकडाऊनमुळे सध्या हे बुटीक बंद असले तरी घरीच त्यांचे काम जोरात सुरू आहे. शिवणकामात त्या तरबेज आहेतच. परंतु साडय़ांमधून विविध पोषाख तयार करण्यात त्या निपूण आहेत. म्हणूनच त्यांच्याकडे येणाऱया ग्राहकांमध्ये तरुणींची संख्या अधिक आहे.
स्वावलंबन हे नेहमीच महत्त्वाचे
त्या म्हणतात, स्वावलंबन हे नेहमीच महत्त्वाचे असते. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येतातच. माझे तर पोलीस होण्याचे स्वप्नच भंगले. परंतु हातपाय गाळून चालणार नाही, याची जाणीव ज्या क्षणी झाली त्या क्षणी मी उभी राहिले. कुटुंबाचा पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो. जेंव्हा उभे राहण्याची धडपड, प्रयत्न इतरांच्या लक्षात येतात तेंव्हा समाजही पुढे होऊन हात देतो. तो हातात घेऊन पुढे जाणेच श्रेयस्कर असते. नाही या शब्दावर माझा विश्वास नाही. कदाचित म्हणूनच मी इतकी वाटचाल करू शकले आहे.









