कोरोना बाधितांची वाढती संख्या रोखण्यासाठी व्यापारी स्वयंस्फूर्तीने पाळणार बंद
वार्ताहर/ कराड
कराड शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांत कोरोना बाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. बाजारपेठेतील अनेक व्यपाऱयांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे वाढत्या बाधितांच्या संख्येला रोखण्यासाठी 1 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर दरम्यान पुन्हा कराड लॉकडाऊन करण्याचा निर्णय कराडच्या सर्व व्यापारी संघटनांनी घेतला आहे. याबाबत सोशल मीडियावरही पोस्ट व्हायरल होत आहेत.
कराड तालुक्मयातील कोराना बाधितांचा आकडा तीन हजारांपर्यंत गेल्याने भीतीचे वातावरण आहे. तर कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन व व्हेंटिलेटरचे बेड मिळत नसल्याने भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर पाच महिन्यांनी बाजारपेठ सुरू झाली. मात्र बाजारपेठेत खरेदीसाठी उसळणाऱया गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने झाल्याचेही समोर येत आहे. कराड बाजारपेठेतील अनेक व्यपाऱयांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर काही व्यापाऱयांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे.
या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शहरातील सराफ, कापड, किराणा, भांडी, चप्पल व्यापारी आदी संघटनांनी एकत्र येत 1 ते 8 सप्टेंबर दरम्यान कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन गरजेचे असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.








