कोरोना दहशतीचे भय इथले अजून संपले नाही

इतिहासात पहिल्यांदाच कोरोनासारख्या महाभयंकर महामारीने संपूर्ण जगाला हादरवून टाकले. यामुळे नेहमी धावणारे शहर म्हणून ओळख असणारे बेळगावही थांबले. कोरोना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले. जवळची माणसे गेली, नोकऱया गेल्या, आयुष्यात अनेक बदल झाले. याला आता एक वर्ष पूर्ण होत असले तरी अद्याप कोरोनाचा धोका मात्र कायम आहे.

२४ मार्चच्या रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील 21 दिवस लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. यामुळे देशभरात एकच गोंधळ उडाला. पुढील महिनाभर होईल-पुरेल इतके साहित्य खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली. त्या दिवशी रात्रभर किराणा मालाची दुकाने सुरू होती. 25 मार्चच्या पहाटेपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आला. रस्त्यांवर असणारा शुकशुकाट, बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले पोलीस असे चित्र सर्वत्र पाहायला मिळत होते.

दहशतीच्या वातावरणात पार पडला गुढीपाडवा
लॉकडाऊन जाहीर झालेल्या दुसऱयाच दिवशी म्हणजे 25 मार्च रोजी गुढीपाडवा सण होता. हिंदू वर्षातील पहिलाच सण म्हणून ओळख असलेला गुढीपाडवा कोरोनामुळे दहशतीच्या वातावरणाखाली साजरा करण्यात आला. गुढीपाडव्याला गोडधोड करण्यासाठी आदल्या दिवशी रात्रीपर्यंत नागरिकांची खरेदी सुरू होती. गुढीपाडव्यादिवशी मात्र घरात राहूनच नागरिकांनी हा सण साजरा केला.

कोविड सेंटरची सोय

कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी प्रारंभी सिव्हिल हॉस्पिटल येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले. कोरोनाबाधित असलेल्या रुग्णांसोबतच त्याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची कसरत करावी लागत होती. कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढू लागताच जिल्हा प्रशासनाने तालुक्मयाच्या ठिकाणी कोविड सेंटर सुरू केले. विविध ठिकाणी आयसोलेशन सेंटरही सुरू करण्यात आली. तरीही रुग्णांची संख्या अधिक असल्यामुळे हॉस्पिटल मिळत नसल्याने रुग्णांची हेळसांड झाली.
कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला 3 एप्रिलला

3 एप्रिल 2020 रोजी जिल्हय़ात पहिल्या तीन जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कॅम्प, हिरेबागेवाडी व बेळगुंदी येथील तिघांचा यामध्ये समावेश होता. त्यानंतर हिरेबागेवाडी, बेळगाव शहर व रायबाग तालुक्मयातील कुडची येथे रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढू लागली. 15 एप्रिल रोजी बेळगावचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला. 10 मे रोजी कोरोना बाधितांची संख्या 100 वर पोहोचली. जुलै-ऑगस्टमध्ये तर प्रत्येक दिवशी 450 ते 500 रुग्ण अशी संख्या वाढत चालली होती. बेळगाव जिल्हय़ात कोरोनाचा पहिला बळी 13 एप्रिल रोजी हिरेबागेवाडी येथे तर बेळगाव शहरात पहिला बळी 1 जून रोजी गेला.
आरोग्याची जागृती वाढली

कोरोनाआधी आपल्या देशात आरोग्याविषयी तितकीशी खबरदारी घेण्यात येत नव्हती. परंतु कोरोनाचे संकट येताच नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्यास सुरुवात केली. घरोघरी मास्क, सॅनिटायझरचा वापर सुरू करण्यात आला. कधी नव्हे ते प्रत्येकजण गरम पाणी, काढे यांचे सेवन करू लागले. शारीरिक क्षमता वाढावी, आहारामध्ये शक्ती वाढविणारे पदार्थ समाविष्ट केले जाऊ लागले. वृद्धांची घरातच ऑक्सिनजची पातळी तपासली जाऊ लागली. त्या काळात क्वचितच डॉक्टर सेवा देत असल्याने स्वतःच आरोग्याची काळजी घेणे जरुरीचे झाले होते.

उद्योगांची चाके थांबली
कोरोनाचा धोका वाढताच 20 मार्च 2020 पासून बेळगावमधील कारखाने बंद ठेवण्यात आले. 24 मार्च रोजी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे त्यानंतर सर्वच कारखाने बंद करण्यात आले. लॉकडाऊन खुले केल्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून पुन्हा कारखाने सुरू करण्यात आले. पहिल्या टप्प्यात अत्यंत कमी कारखाने अनेक निर्बंधांसह सुरू झाले. परंतु बाहेरून येणारा कच्चा माल, गावी परतलेले कुशल कामगार व त्यानंतरच्या काळात कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती यामुळे उद्यमबाग परिसरातील 40 हून अधिक कारखाने बंद करण्यात आले.
शिक्षणाला ऑनलाईनचा आधार
लॉकडाऊनच्या आधीपासूनच खबरदारी म्हणून शाळा-कॉलेज बंद केली. त्यानंतर पुढील काही दिवस शाळा बंद राहणार हे लक्षात येताच शिक्षण खात्याने ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निवडला. स्मार्टफोन, इंटरनेट, लॅपटॉप यांचा वापर करून विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यासक्रम पोहोचविला जाऊ लागला. शिक्षक व्हिडिओ तयार करून तो विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर पाठवत होते. पुढील 7 ते 8 महिने ऑनलाईनद्वारेच शिक्षण घ्यावे लागले.
परप्रांतीय मजूर गावी परतले
बेळगाव शहर व परिसरात उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान येथील अनेक परप्रांतीय मजूर काम करत होते. परंतु लॉकडाऊनमुळे हे परप्रांतीय कामगार मिळेल त्या वाहनाने आपापल्या मूळ गावी परतले. परप्रांतीय कामगारांना त्यांच्या गावी परतण्यासाठी रेल्वे विभागाने श्रमिक एक्स्प्रेस सुरू केली. बेळगाव, हुबळी या परिसरातून दोन ते तीन श्रमिक एक्स्प्रेस धावल्या. यातून शेकडो परप्रांतीय मजूर आपापल्या गावी परतले.
औद्योगिक क्षेत्राने शोधल्या नव्या वाटा
कच्च्या मालाची उपलब्धता तसेच तयार झालेल्या मालाची निर्यात होत नसल्याने बेळगावमधील उद्योगांनी नव्या वाटा शोधल्या. लॉकडाऊनपासून मास्क बनविणे, सॅनिटायझर, व्हेंटिलेटर, पीपीई कीट यासह इतर उद्योगांना चालना मिळाली. बेळगावमधील अनेक कंपन्यांनी ऑटोमेटिक सॅनिटायझर तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला.
पोलीस, डॉक्टर, कार्यकर्त्यांचे उत्तम कार्य
लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांना घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती. परंतु या काळातही पोलीस, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्तम सेवा बजावली. घरोघरी जाऊन सामाजिक कार्यकर्त्यांनी अन्नधान्य तसेच औषधे पोहोचविली. लोक रस्त्यावर येणार नाहीत यासाठी रात्रंदिवस डोळय़ात तेल घालून पोलीस सेवा बजावत होते. वेळप्रसंगी न जुमानणाऱयांना काठीचा प्रसादही मिळाला. या काळात डॉक्टरांनीही उत्तम सेवा बजावली.
गावी आलेल्यांना शेतीचा आधार
लॉकडाऊन सुरू होताच नोकरी, शिक्षण, व्यवसाय, उद्योग यासाठी जिल्हय़ाबाहेर असलेले नागरिक बेळगावमध्ये परतले. परंतु ते गावी आल्यानंतर त्यांच्या समोर आर्थिक प्रश्न उभा राहिला. नोकरी-व्यवसायाच्या संधी उपलब्ध नसल्याने अखेर त्यांना शेतीकडे वळावे लागले. अनेकांनी शेती तसेच शेतीपूरक व्यवसाय सुरू केले. या काळात कुक्कुटपालन, शेळी पालन, गो-पालन मोठय़ा प्रमाणात सुरू झाले. अनेकांनी भाजी विक्री करण्यास सुरुवात केली.
लॉकडाऊनमुळे कुटुंब आले एकत्र
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुटुंबातील सर्व सदस्य क्वचितच एकत्रित येतात. परंतु लॉकडाऊनमुळे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र आले. बाहेर पडता येत नसल्याने घरांमध्ये राहून एकमेकांची सुख-दुःखे जाणून घेतली.
डिजिटल व्यवहारांमध्ये झाली वाढ
लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर बाहेर पडण्यास मनाई असल्याने घरात राहूनच डिजिटल व्यवहार करणे नागरिकांना सोयीचे ठरत होते. नोटांमधून कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असल्याने डेबिट कार्ड तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम यासारख्या ऍप्सचा वापर वाढला. किराणा मालाच्या दुकानांसोबतच पेट्रोलपंप, गॅस एजन्सी, खाद्यपदार्थांचे मॉल यामध्ये याचा वापर वाढला.
महापालिका प्रशासनाची चांगलीच दमछाक

कोरोना विषाणूचा फैलाव सुरू झाल्यानंतर संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करून खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात आल्या. लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू झाल्याची वर्षपूर्ती होत आहे. मात्र वर्षानंतरही सर्वसामान्य नागरिक कोरोना विषाणूच्या धास्तीखाली जीवन जगत आहेत. वर्षभराच्या कालावधीत अनेक कटू प्रसंगांना तोंड द्यावे लागले. महापालिका प्रशासनाची देखील वर्षभरात चांगलीच दमछाक झाली.
कोरोना विषाणूचा प्रभाव कसा आहे, कसा दिसतो, विषाणूचे परिणाम काय? याची माहिती प्रत्यक्षात समोर आली नाही. मात्र, विषाणूची लागण झाल्यामुळे श्वासोच्छवास घेण्यास त्रास होतो. तसेच मनुष्याचा मृत्यू होतो, इतक्मयाच माहितीच्या आधारे विविध उपाययोजना राबविण्यास प्रारंभ करण्यात आला. शिंक आल्यामुळे किंवा एकमेकाच्या संसर्गातून विषाणूची बाधा होते, असे तज्ञांनी सांगितले. त्या आधारावर विषाणूची लागण झालेल्यांना क्वारंटाईन करणे तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात येत होते. शहरात औषध फवारणी करणे, स्वच्छता राखणे, रुग्णांना क्वारंटाईन करणे तसेच रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांना क्वारंटाईन करणे अशा विविध उपाययोजना राबविण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनावर सोपविण्यात आली होती. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत महापालिकेच्या अधिकाऱयांना व कर्मचाऱयांना या जबाबदाऱया पार पाडाव्या लागल्या. क्वारंटाईन केलेल्या रुग्णांवर नजर ठेवणे, परराज्यांतून येणाऱया नागरिकांची माहिती घेऊन त्यांना हॉटेल किंवा निम्नसरकारी संस्थेत क्वारंटाईन करण्यात येत होते. अशा विविध जबाबदाऱयांच्या ओझ्याखाली कोरोनाच्या धास्तीत महापालिका प्रशासनाच्या कर्मचाऱयांना कार्य करावे लागले. या कालावधीत महापालिकेचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. महसूल वसुली, नागरिकांची कामे, तसेच इमारत बांधकाम परवाने असे सर्व कामकाज बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांना मोठा फटका बसला. तसेच महापालिकेचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. जूननंतर लॉकडाऊन मागे घेण्यात आले. मात्र, पावसाळय़ामुळे रितसर कामकाज सुरू होण्यास विलंब लागला. पण कोरोनाचा प्रभाव आजही कायम असल्यामुळे नियम, अटींचे पालन करत नागरिकांना काम करावे लागत आहे.
लॉकडाऊन काळात महापालिकेला शासनाकडून कोणतेच अनुदान मंजूर झाले नाही. त्यामुळे विकासकामांवर मोठय़ा प्रमाणात परिणाम झाला. लॉकडाऊनपूर्वी मंजूर झालेल्या निधीमधून राबविण्यात येणाऱया विकासकामांना ब्रेक लागला. त्यामुळे वर्षभरात एकाही विकासकामाची सुरुवात झाली नाही. जानेवारीनंतर विविध विकासकामे राबविण्यास सुरुवात करण्यात आली. मनपाच्यावतीने घरपट्टीवर 5 टक्के सवलत देण्यात आली. त्यामुळे वर्षभराच्या कालावधीत 75 टक्के घरपट्टी वसूल झाली आहे. मात्र, 2020-21 या आर्थिक वर्षाची घरपट्टी वसूल करण्यात मनपाला अपयश आले. मार्च महिन्याच्या अखेरीसच लॉकडाऊन केल्याने नागरिक घरपट्टी भरण्यास बाहेर पडलेच नाहीत. परिणामी मनपाच्या महसुलात घट झाली. लॉकडाऊन काळात अधिकाऱयांना व कर्मचाऱयांना विविध कामे करावी लागल्याने कोरोनाची लागणही झाली. मात्र बहुतांश अधिकारी व कर्मचाऱयांनी आपल्या जबाबदाऱया व्यवस्थित पार पाडल्या. लॉकडाऊन काळात नागरिकांना व रुग्णांना क्वारंटाईन करणे, गरजूंना जेवण देणे, शहरात सॅनिटायझर करणे तसेच विविध ठिकाणी बॅरिकेड्स लावणे अशा विविध कामांसाठी वर्षभरात 2 कोटीचा खर्च झाला आहे. सदर अनुदान राज्य शासनाने कोविड अनुदानांतर्गत मंजूर केले आहे. मात्र, वर्षभरातील महापालिकेचे कामकाज पाहता शहरवासियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.
लॉकडाऊन नको रे बाबा…!

आजही कोरोनाच्या छायेखाली जगावे लागत आहे. लॉकडाऊनच्या अंमलबजावणीची वर्षपूर्ती झाली. मात्र लॉकडाऊन काळात निर्माण झालेल्या समस्या, उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता यापुढे लॉकडाऊन नको रे बाबा…! अशाच प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहेत.









