दिल्लीमधल्या महाविद्यालयांचे, शैक्षणिक संस्थांचे आणि विद्यापीठांचे शिक्षण जगताला नेहमीच आकर्षण आणि अप्रूप वाटत आले आहे. मोठय़ा विद्यापीठांमधील खऱया अर्थाने मोठय़ा असणाऱया प्राध्यापकांना भेटल्यावर आपल्याला शिक्षकी पेशातील ‘वर्म’ आणि ‘मर्म’ गवसू शकते, दिल्ली विद्यापीठातील मानववंशशास्त्र विभागाच्या एका थोर प्राध्यापकाकडून. प्रो. विनयकुमार श्रीवास्तव हे आपल्या सर्वांच्याच परिचयाचे असलेले त्यांचे नाव. त्यांच्या कामाची थोरवी ऐकून-अनुभवून, त्यांच्या मोठेपणाचे दडपण पहिल्या भेटीपर्यंतच राहत असे. त्यांच्या स्वभावातील अकृत्रिम जिव्हाळा अनुभवल्यावर भीती, दडपण, संकोच या भावना आपोआपच गळून पडायच्या. लिखाण असो वा प्रशिक्षण, वर्गातील तास असो वा गप्पा ‘या हृदयीचे त्या हृदयी’ संवाद साधणारा खराखुरा ‘प्रोफेसर’ दिल्लीच्या शैक्षणिक विश्वानेच नव्हे, तर देशाने गमावला आहे.
दिल्लीमधल्या हंसराज महाविद्यालयातून पदवी (1969) घेऊन दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून विद्यापीठ पारितोषिकासह त्यांनी पदव्युत्तर शिक्षण संपादन केले. कारकिर्दीच्या प्रारंभी त्यांनी हिंदू कॉलेजमध्ये 9 वर्षे समाजशास्त्र विषयाचे अध्यापन केले. पुढे त्यांनी 2010-12 या कालावधीत विद्यापीठाच्या विनंतीवरून याच महाविद्यालयाचे प्राचार्यपदही सुशोभित केले होते. सेवानिवृत्तीपर्यंतची त्यांची बहरलेली कारकीर्द दिल्ली विद्यापीठात मानववंश शास्त्रज्ञ म्हणून राहिली. त्यांनी चीनमध्ये माओचे निधन झाल्यानंतर ‘चीनमधील व्यक्तिप्रभुत्व सामाजिक बांधणी’ या विषयावर एम्. फिल पदवीसाठी संशोधन केले होते. या संशोधनामध्ये त्यांनी मॅक्सवेबरच्या सत्ता, नियंत्रण आणि अधिकार या संकल्पनांचे सखोल विश्लेषण केले होते. अध्यापन कालतच अभ्यास रजा घेऊन त्यांनी ‘केंब्रीज’ विद्यापीठातून पश्चिम राजस्थानमधील पशुपालक समाजातील धार्मिक, आध्यात्मिक अवधारणांचा अभ्यास करून विद्यावाचस्पती पदवी मिळवली होती. पशुपालक समाजासोबतचे त्यांचे नाते आयुष्यभर टिकून राहिले. राजस्थानमध्ये डॉ. एल्से कोहेलर रोलेफसन या जर्मन विदुषीने केलेल्या उंटांवरील अभ्यासाला, संवर्धनातील प्रयत्नांना त्यांनी सदैव सोबत केली. ‘लोकहित पशुपालक संस्थे’ला त्यांचे मार्गदर्शन हक्काचे आणि आपलेपणाचे असायचे.
प्रो. श्रीवास्तव स्थळ, काळ, वेळ आणि भान हरपून, समोरच्या विद्यार्थ्यांना समृद्ध करणारे शिक्षक होते. त्यांच्या प्रारंभिक कालत ‘फल आणि खडू’ हे शिकवण्याचे माध्यम होते. शिकवताना त्यांचा फल शब्दांनी-चित्रांनी पूर्ण भरलेला असायचा आणि त्यांचा कोट वा कपडे खडूच्या पांढऱया भुकटीने माखलेले दिसायचे. वर्गामध्ये शिकवताना ते त्यांच्या विषयातील व्यासंगाने आणि शब्दांवरील हुकमतीने विद्यार्थ्यांना अक्षरशः संमोहित करून अध्यापन विषयातील क्षेत्रात फिरवून आणत. निव्वळ, त्यांच्या शिकवण्यामुळे विद्यार्थ्यांना राजस्थानमधील रायका, पश्चिम बंगालमधील संथाळ, नैर्त्रुत्य-ईशान्य भागातील आदिम जमातींना भेटून आल्यासारखे वाटायचे. 1985 मध्ये प्रो. श्रीवास्तव हिंदू महाविद्यालय सोडून विद्यापीठात आले होते. सद्या ‘ऑक्सफर्ड’मध्ये शिकवणाऱया प्रो. विभा जोशी सांगतात, प्रो. श्रीवास्तवांमुळेच अनेक विद्यार्थी मानववंश शास्त्राकडे वलयचे. विद्यार्थ्यांनी त्यांना पहिल्या नावाने हाक मारण्याची मुभा असायची. नव्हे तो त्यांचा आग्रह असायचा. ज्ञान क्षेत्रातील प्रभुत्ववाद नाकारून ते व्यवहारात कुणाशीही समान पातलवर वागायचे.
विद्यार्थ्यांना क्षेत्रकार्या (फील्डवर्क) मध्ये मदत करण्यासाठी ते स्वतः प्रत्यक्ष सोबत करायचे. मध्य प्रदेशातील चंबळला लागून असणाऱया भागामध्ये शरणागती पत्करलेल्या ‘सहरीया’ समाजातील पूर्वाश्रमीच्या डाकूंचा त्यांच्या विद्यार्थिनीला अभ्यास करायचा होता. पूर्वी शासनाची धोरणेदेखील अशा अभ्यासांवर आखण्याचे प्रघात असल्यामुळे परवानग्यांची औपचारिकता कमी असायची. त्यांना स्वतःला असणाऱया माणसांविषयीच्या कुतूहलापोटी आणि विद्यार्थिनीला मदत होईल म्हणून ‘प्रोफेसर’ स्वतः कार्यक्षेत्रात होते. असे अनेक अभ्यास त्यांनी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवाधारित (इम्पिरिकल) केलेले आहेत. अशा अनुभवांच्या श्रीमंतीमधून ‘मेथडोलॉजी ऍन्ड फील्डवर्क’ हे त्यांनी संपादित केलेले ऑक्सफर्ड प्रकाशित पुस्तक आजही अनेकांच्या आवडीचे आहे. प्रो. श्रीवास्तव यांनी त्यांच्या 41 वर्षांच्या शैक्षणिक कारकिर्दीत सव्वीस पुस्तके, 145 संशोधन निबंध आणि शेकडो लेख लिहिलेले आहेत. आताही त्यांची 3 पुस्तके अंतिम टप्प्यात होती. त्यांनी कधीही आपल्या कोणत्याही विद्यार्थ्याचा लिखाणाचा मसुदा संपादित करून देण्याचे कमीपणाचे मानले नाही. त्यांचे विद्यार्थी त्यांना प्रेमाने ‘एडिटर ऑफ स्टुडंट टेक्स्ट’ म्हणायचे. विद्यार्थ्यांना एखादी संज्ञा, संकल्पना वा शब्द समजावून घ्यायचा असला तरी त्यांचा ‘दूरध्वनी प्रशिक्षण वर्ग’ ओघवता असे. त्यांना भारतातील, दक्षिण आशियातील आणि एकूणच जगतातील भटक्मया विमुक्त समाजाविषयी ममत्व होते. गेल्या काही दशकात आलेल्या भटक्मया समाजातील आत्मवृत्तांची त्यांना माहिती होती. मात्र या लेखकांनी आत्मवृत्तांच्या पलीकडे जाऊन सामाजिक संशोधनाची शास्त्रीय बूज सांभाळून ‘सामाजिक दस्तावेज’ तयार करावेत. त्यासाठी त्यांनी ‘आयसीएसएसआर’ वा ‘एएसआय’ या संस्थांची मदत घ्यावी असा त्यांचा आग्रह होता. आत्मवृत्तपर लिखाणातून माणूस मोठा होतो. मात्र सामाजिक संशोधनातून समाजाचे प्रश्न मार्गी लागतात, अशी त्यांची धारणा होती. राष्ट्रीय विमुक्त, भटके आणि अर्ध-भटके आयोगाच्या कामात त्यांनी उत्स्फूर्तपणे मदत केल्याचा इतिहास आहे. (रेणके आयोग, ईदाते आयोग) प्रो. श्रीवास्तव एकाच वेल ‘जर्नल ऑफ ऍन्थ्रोपोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया’, ‘सोशल चेंज’ आणि ‘दि इस्टर्न ऍन्थ्रोपोलॉजिस्ट’ या सेजद्वारा प्रकाशित होणाऱया तीन शोधनियतकालिकांचे संपादक म्हणून काम करीत होते. गेली तीन वर्षे ते ‘एएसआय’ च्या कामासाठी कोलकातामध्ये राहात असले तरी आठवडय़ातून एक दिवस ते दिल्लीमध्ये काम करीत होते. आवडीचे काम करता यावे यासाठी त्यांनी अनेक मोठय़ा विद्यापीठांच्या मोठय़ा ‘ऑफर’ देखील नाकारल्या होत्या.
अचूक शब्द वापरण्याबाबत त्यांचा नेहमी आग्रह असायचा. इंग्रजीमध्ये लिखाण केलेल्या या संशोधकाची उर्दू भाषेची जाणही विलक्षण होती. बेगम अख्तर, मेहंदी हसन, साहिर लुधियान्वी या त्यांच्या ‘हळव्या’ जागा होत्या. इतिहासाच्या आणि सूफीवादाच्या अभ्यासक, त्यांच्या आयुष्याच्या जोडीदार प्रो. कुमकुम यांचा प्रत्येक लेख वाचून त्यांना मदत करणारे आणि आपला प्रत्येक लेख त्यांना वाचून दाखवणारे प्रो. श्रीवास्तव अनंताच्या प्रवासाला निघाले. त्यांच्या श्रद्धांजली सभेला देश-विदेशातील अनेक विद्वान उपस्थित होते. त्यांच्या श्रीमती आणि त्यांचे अनेक विद्यार्थी पोरकेपण अनुभवत आहेत. सरांना विनम्र श्रद्धांजली!
डॉ. जगदीश जाधव








