मागील वर्षातील उपजेतेपदानंतर आता जेतेपदाचे लक्ष्य
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अलीकडील कालावधीत कमालीची प्रगल्भता लाभलेल्या युवा धडाकेबाज कर्णधार रिषभ पंतच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सचा संघही यंदा आयपीएलच्या झळाळत्या चषकावर आपले नाव कोरण्यासाठी महत्त्वाकांक्षी असणार आहे. मागील हंगामात हा संघ उपविजेता ठरला होता. यंदा आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.
भक्कम फलंदाजी व तितक्याच तोलामोलाची जलद गोलंदाजी यामुळे दिल्लीला यंदाच्या हंगामासाठी प्रबळ दावेदारात गणले जाते. आठवडाभरापूर्वीच श्रेयस अय्यर खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या संघाच्या नेतृत्वाची धुरा पंतकडे सोपवली गेली. अय्यरला मागील महिन्यात इंग्लंडविरुद्ध संपन्न झालेल्या वनडे मालिकेदरम्यान खांद्याला दुखापत झाली होती.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ मागील काही हंगामापासून सातत्याने प्रगती करत आला असून 2019 मध्ये ते सेकंड रनरअप ठरले तर गतवर्षी अंतिम फेरीपर्यंत पोहोचले. यंदा त्यांची आयपीएल मोहीम दि. 10 एप्रिल रोजी चेन्नई सुपरकिंग्सविरुद्धच्या लढतीने सुरु होईल.
फलंदाजी-गोलंदाजी मजबूत
शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे यांच्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाची फलंदाजी भक्कम आहे तर रिषभ पंत, मार्कस स्टोईनिस, शिमरॉन हेतमेयर, सॅम बिलिंग्ज यांच्यामुळे मधल्या फळीत देखील फारशी चिंता नाही. याशिवाय, स्टीव्ह स्मिथमुळे या संघाची फलंदाजी आणखी भरभक्कम असणार आहे.
2020 च्या हंगामात शिखर धवन सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत 618 धावांसह दुसऱया स्थानी राहिला. शिवाय, इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेत अनुक्रमे 98 व 67 धावांची खेळी साकारत त्याने आपला फॉर्मही दाखवून दिला आहे.
या संघातील पृथ्वी शॉने अलीकडेच सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेत सर्वाधिक 827 धावांची आतषबाजी केली असून तोच धडाका येथेही कायम राखण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. रिषभ पंत ऑस्ट्रेलिया व इंग्लंडविरुद्ध अलीकडील कालावधीत संपन्न झालेल्या मालिकांमध्ये मॅचविनर म्हणून नावारुपास आला असून येथे अष्टपैलू स्टोईनिस, बिलिंग्ज यांच्यासह दिल्लीला दमदार मजल गाठून देण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे.
जलद-मध्यमगती गोलंदाजीच्या आघाडीवर कॅगिसो रबाडा व ऍनरिच नोर्त्झे यांनी मागील हंगामात एकत्रित 52 बळी घेण्याचा पराक्रम गाजवला होता. यंदा त्यांना ख्रिस वोक्सची साथ लाभेल. शिवाय, इशांत शर्मा, उमेश यादव यांच्यामुळे ही लाईनअप आणखी भक्कम असणार आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघ ः शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, शिमरॉन हेतमेयर, मार्कस स्टोईनिस, ख्रिस वोक्स, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, अमित मिश्रा, ललित यादव, प्रवीण दुबे, कॅगिसो रबाडा, ऍनरिच नोर्त्झे, इशांत शर्मा, अवेश खान, स्टीव्ह स्मिथ, उमेश यादव, रिपल पटेल, विष्णू विनोद, लुकमन मेरिवाला, एम. सिद्धार्थ, टॉम करण, सॅम बिलिंग्ज.
पर्यायी खेळाडूंची उणीव कशी भरुन काढणार?
दिल्ली संघात अनेक दिग्गज खेळाडू समाविष्ट असले तरी त्या ताकदीने त्यांची जागा भरुन काढणारे पर्यायी खेळाडू नाहीत आणि हीच त्यांची मुख्य चिंता आहे. पर्यायी खेळाडू नसल्यामुळेच मागील हंगामात ते कॅगिसो रबाडा व ऍनरिच नोर्त्झे यांना विश्रांती देऊ शकले नव्हते.
अगदी यष्टीरक्षणाच्या निकषावर देखील या संघाकडे रिषभ पंतसाठी दुसरा ताकदीचा पर्याय नाही. त्यामुळे, पंतला मोक्याच्या क्षणी काही कारणाने संघाबाहेर रहावे लागले तर या संघाची तारांबळ उडू शकते. यंदा यष्टीरक्षणात त्यांच्याकडे केरळचा विष्णू विनोदचा पर्याय उपलब्ध आहे. अर्थातच त्याच्याकडे अनुभवाची शिदोरी नाही. इशांत शर्मा व उमेश यादव अलीकडील कालावधीत फारसे मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळत नसल्याने भारतीय जलद गोलंदाज नाहीत, ही त्यांची आणखी एक कमकुवत बाजू असेल.
धोनीच्या छायेतून बाहेर येणारा पंत व नवी आव्हाने
यष्टीरक्षणात धोनीचा उत्तराधिकारी म्हणून पाहिले गेलेल्या रिषभ पंतने मागील 3-4 महिन्यांच्या कालावधीत भरीव योगदान दिले असून आता त्याच्यासमोर संघाची जबाबदारी हाताळण्याबरोबरच या जबाबदारीचा आपल्या आक्रमक फलंदाजीवर विपरित परिणाम होणार नाही, याचीही काटेकोर दक्षता घ्यावी लागेल. या लीग स्पर्धेमुळे रिषभ पंतची आयसीसी टी-20 विश्वचषकासाठी मात्र उत्तम तयारी होऊ शकेल. आगामी विश्वचषकाच्या उंबरठय़ावर आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवण्यासाठी अनुभवी रविचंद्रन अश्विन व युवा अष्टपैलू अक्षर पटेल यांच्यासाठी देखील ही नामी संधी असणार आहे.









