लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या अनेक परप्रांतियांना मिळाला रेशनचा लाभ
प्रतिनिधी / बेळगाव
लॉकडाऊन काळात ‘एक देश एक रेशनकार्ड’ योजना अनेकांना लाभदायक ठरत आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याने देशात सतत स्थलांतर करणाऱया नागरिकांसाठी सुरू केलेली ही योजना लॉकडाऊन काळात महत्त्वपूर्ण ठरत आहे.
देशात नोकरी, व्यवसाय, उद्योगधंद्यांसाठी एका ठिकाणाहून किंवा एका राज्यातून दुसऱया राज्यात स्थलांतर करणाऱया नागरिकांची संख्या अधिक आहे. अशा नागरिकांना रेशन घेणे सोयीस्कर व्हावे, याकरिता एक देश एक रेशनकार्ड योजना राबविण्यात आली आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीय अडकून पडले आहेत. अनेकांना आपल्या राज्यात जाता येत नाही. अशांसाठी ही योजना उपयुक्त ठरत आहे.
देशपातळीवर एक देश एक रेशनकार्ड योजना प्रभावी ठरत आहे. या योजनेंतर्गत देशातील कोणत्याही राज्यात लाभार्थी रेशनचा लाभ घेऊ शकतात. दरम्यान, बेळगावात राहणारे कुटुंब दिल्लीतील सरकारमान्य रेशन दुकानातून रेशन घेऊ शकते. कोरोनाकाळात परप्रांतीय देशभर अडकले. दरम्यान, रेशन न मिळाल्याने अनेकांचे हाल झाले. याची दखल घेत केंद्र सरकारने देशातील जनतेसाठी ‘एक देश एक रेशनकार्ड’ योजना राबविली आहे. यामुळे देशातील कोणत्याही जवळच्या रेशन दुकानातून लाभार्थी रेशन मिळवू
शकतात.
एक देश एक रेशनकार्ड पुढाकाराच्या दिशेने पाऊल टाकत ‘मेरा रेशन’ मोबाईल ऍप सादर करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी स्वतःचे घर बदलून दुसऱया ठिकाणी राहायला गेल्यास या ऍपद्वारे रास्त दराचे धान्य दुकान जवळ कोठे आहे, त्या ठिकाणी कोणत्या सुविधा पुरविल्या जातात, याची संपूर्ण माहिती मिळते. संबंधित लाभार्थी गुगल प्ले स्टोअरवरून हे ऍप डाऊनलोड करून योजनेचा लाभ घेऊ शकतात.









