प्रतिनिधी / बेळगाव
देशात अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे ‘वन नेशन वन रेशन’ योजनेला प्रारंभ झाला आहे. याअंतर्गत देशातील रेशनकार्डधारकांना इतर राज्यांतील रेशन दुकानांतून रेशन उपलब्ध होणार आहे. कर्नाटक, बिहार, उत्तरप्रदेश, राजस्थान व इतर राज्यांतून कामासाठी बेळगावात आलेल्या परप्रांतीयांना या योजनेचा लाभ होणार आहे. याकरिता परप्रांतीयांना वाटप करण्यात आलेल्या रेशनची नेंद दुकानदारांना ठेवावी लागणार आहे.
देशात एका राज्यातून दुसऱया राज्यात कामासाठी स्थलांतर होणाऱया कामगारांची संख्या अधिक आहे. अशा परप्रांतीयांना या योजनेमुळे रेशन उपलब्ध होणार आहे. रेशनवेळी मिळणारे सर्व साहित्य रेशनकार्डधारकांना देण्याची जबाबदारी दुकानदारांवर वाढली आहे. रेशन पुरवठा प्रक्रिया ऑनलाईन झाल्याने प्रत्येक कार्डधारकाची माहिती अन्न व नागरी पुरवठा खात्याकडे उपलब्ध होते. एकूण रेशनकार्डधारकांना किती रेशनचे वाटप झाले, याचा संपूर्ण तपशील दुकानदारांना ठेवावा लागत आहे. यात थोडी चूक झाल्यास याचा फटका दुकानदारांना बसणार आहे. आर्थिकदृष्टय़ा गोरगरीब जनतेला अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून रेशन उपलब्ध करून दिले जाते. मात्र, काही लोक नोकरी व कामानिमित्त विविध राज्यात वास्तव्य करतात. अशांना रेशनपासून वंचित रहावे लागत होते. मात्र, आता ‘एक देश एक रेशनकार्ड’ या योजनेमुळे रेशनचा लाभ घेता येणार आहे.









