सेन्सेक्स 1203 अंकांनी घसरले : बँकिंग क्षेत्रात मोठी घसरण
वृत्तसंस्था / मुंबई
भारतीय शेअर बाजारात एक दिवसाच्या तेजीनंतर पुन्हा मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. चालू आठवडय़ातील पहिल्या दिवशी सोमवारी बाजारात घसरण झाल्यानंतर मंगळवारी मात्र समाधानकारक तेजीचे वातावरण मुंबई शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजारात राहिले होते. तसेच पुन्हा बुधवारी बाजारांमध्ये मोठी घसरण झाल्याचे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. दिवसभरातील व्यवहारानंतर अंतिम क्षणी बीएसई सेन्सेक्स 1203.18 अंकांनी घसरुन निर्देशांक 28,265.31 वर बंद झाला.दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 343.95 अंकांनी घसरण नोंदवत निर्देशांक 8,253.80 वर बंद झाला. भारताचे आर्थिक वर्ष मार्च 31 रोजी समाप्त होते, आणि नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरु होते. त्यामुळे सर्व व्यवहार पूर्ण करण्यासाठी व्यापारी क्षेत्राची धडपड सुरु असते. परंतु यावेळी कोरोनाच्या संकटामुळे सर्व आर्थिक क्षेत्र सुन्न पडल्याचे चित्र देशात आहे.
दिवसभरातील व्यवहारात प्रामुख्याने बँकिंग क्षेत्रातील कामगिरी असमाधानकारक राहिली आहे. यातील समभागांमध्ये 10 टक्क्मयांपर्यंत घसरण झाली असून बीएसईमधील 9 बँकांचे समभाग कोसळले आहेत. जवळपास 45 टक्के कंपन्याचे समभाग नुकसानीत राहिले आहेत.
बाजारात बुधवारी 284 कंपन्यांचे समभाग अपर सर्किट आणि 215 कंपन्यांचे समभाग लोअर सर्किट लागले होते. ट्रेडिंगच्या दरम्यान बीएसईमधील बँकिंग क्षेत्रात मोठी घसरण पहावयास मिळाली आहे. यात आरबीएल बँक 2.99, ऍक्सिस बँक6.27, आयसीआयसीआय बँक 4.14, स्टेट बँक 5.05, एचडीएफसी बँक 3.71, सिटी युनियन 7.44, कोटक बँक 8.78, इंडसइंड बँक आदीच्या समभागात 2.61 टक्क्मयांनी घसरण नोंदवली आहे.
जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या छायेत
सध्या जगासोबत भारतालाही कोरोना विषाणूच्या थैमानाचा फटका बसत आहे. यामुळे देशातील उद्योगधंदे व अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाल्याने येत्या काळात ही स्थिती सुधारण्यासाठी खुप कालावधी लागणार असल्याचे भाकीत जगभरातील तज्ञांकडून सांगितले जात आहे. यातच संयुक्त राष्ट्र संघाकडून जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीचे चटके सहन करावे लागणार असल्याचे अनुमान मांडले आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी म्हटले आहे, की कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी मजबूत आणि योग्य नियोजन करुन हा लढा देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. सर्व देशांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र लढण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.








