इस्लामपूर / प्रतिनिधी
एक तास राष्ट्रवादीसाठी या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलामार्फत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी संवाद साधण्यात येत असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये या उपक्रमाला साखराळे इस्लामपूर येथे सुरुवात झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी विविध सूचना केल्या त्याची दखल घेत त्यावर उपाययोजना करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी दिली.
बारावीची परीक्षा ऑनलाइन की ऑफलाईन या मुद्द्यावरून विरोधकांनी मुलांची मने कलुषित करण्याचा प्रकार सुरू केला आहे. काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांना लीडर बनवत महाविकास आघाडी सरकार विरोधात कारस्थानं केली जात आहेत. मात्र मुलांच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार करूनच निर्णय घेण्यात येईल. असे पाटील यांनी सांगितले.
पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. जाणून-बुजून रासायनिक खतांच्या किंमती वाढवत शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालण्यात आल्या. देशभर शेतकरी विरोधी भूमिका आपण सातत्याने अनुभवल्या आहेत.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सुमारे ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. येणाऱ्या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांचा रोष ओढवून न घेण्यासाठी, काहीही कारणे न देता शेतकरी बिल मागे घेण्यात आले. विरोधकांना बोलण्याची संधी सुद्धा दिली नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला याचा एकंदरीत परिणाम दिसून येईल. असेही जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.









