इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांची व्हीटीयूकडे मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ (व्हीटीयू) ने इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परीक्षा घेण्याचा विचार सुरू केला आहे. यावषी सर्व अभ्यासक्रम ऑनलाईन केले असताना परीक्षा मात्र ऑफलाईन घेण्याचा अट्टाहास केला जात आहे. सद्यस्थितीत परराज्यांतील विद्यार्थी येथे येऊन परीक्षा देणार आहेत. त्यामुळे एक तर परीक्षा पुढे ढकला, अन्यथा पर्याय द्या, या मागणीसाठी बुधवारी व्हीटीयूच्या प्रवेशद्वारावर इंजिनिअरिंगच्या शेकडो विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.
लॉकडाऊननंतर आपापल्या गावी विद्यार्थी परतले होते. या काळात ऑनलाईन अभ्यासक्रम घेतला जात होता. परंतु बऱयाच भागात इंटरनेटची उपलब्धता नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम हा ऑनलाईन शिकविणे तसे शक्मय नाही. यामुळे विद्यार्थ्यांना अनेक संकल्पना समजलेल्या नाहीत. असे असतानाच ऑफलाईन परीक्षा घेण्याबाबतची तयारी सुरू केली जात असल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देणे गरजेचे
परीक्षा घेण्यापूर्वी किमान महिनाभर तरी ऑफलाईन क्लासेस घेणे गरजेचे होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही योग्यप्रकारे परीक्षेची तयारी करता आली असती. परंतु तसे न करता ऑफलाईन परीक्षा घेण्याबाबत विचार सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार असून, काही दिवस ही परीक्षा पुढे ढकलून ऑफलाईन क्लास घ्यावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांनी व्हीटीयूचे रजिस्ट्रार ए. एस. देशपांडे यांच्याकडे केली. देशपांडे यांनी याबाबत विचार करू, असे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले आहे. यामुळे व्हीटीयू प्रशासन काय निर्णय घेते हे पाहून त्यानंतर आपली भूमिका जाहीर करू, असे विद्यार्थ्यांनी कळविले आहे.
जिल्हाधिकाऱयांनाही निवेदन
ऑफलाईन परीक्षांच्या गोंधळाबाबत बुधवारी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची भेट घेतली. त्यांना ऑफलाईन परीक्षांबाबत माहिती देऊन निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी आपण व्हीटीयू प्रशासनाशी याबाबत चर्चा करू, असे आश्वासन दिले.









