बेळगाव / क्रीडा प्रतिनिधी
दीपक नार्वेकर पुरस्कृत 16 वर्षाखालील बीपीसी लीग क्रिकेट स्पर्धेत उद्घाटन दिवशी एक्सेस इलाईट हुबळी संघाने सुपर एक्सप्रेस अर्जून स्पोर्टस् संघाचा रंगतदार सामन्यात 5 गडय़ांनी तर दुसऱया सामन्यात साईराज हुबळी संघाने एमसीसीसी संघाचा 7 गडय़ांनी पराभव करून विजयी सलामी दिली. प्रभू शशस्त्राr (हुबळी टायगर्स), केदार उसुलकर (साईराज हुबळी) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर उद्घाटनप्रसंगी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, मृणाल हेब्बाळकर, दीपक नार्वेकर, परशराम पाटील, जयसिंह राजपूत, विठ्ठल गवस, नासीर सनदी, नागेश देसाई, विक्रम देसाई आदि मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते यष्टीचे पूजन करण्यात आले.
पहिल्या सामन्यात एक्सेस इलाईटने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. प्रथम फलंदाजी करताना सुपर एक्सप्रेस अर्जुन स्पोर्ट्सने 25 षटकांत 6 बाद 187 धावा केल्या. त्यात ऋषील दोरकाडीने 9 चौकारांसह 75, आकाश असलकरने 1 षटकार आणि 6 चौकारांसह 32 सात्विक सावंतने 19 सिद्देश असलकरने 16 धावा केल्या. एक्सेस इलाईटतर्फे तेजस मुडेश्वरने 27 धावांत 2 तर प्रियांक राजन यादवने 41 धावांत 2, ऋषभ पाटीलने 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल एसेक्स इलाईट हुबळीने 25 षटकांत 5 गडी बाद 188 धावा करून सामना 5 गडय़ांनी जिंकला. शेवटच्या चेंडूवर 4 धावांची गरज असताना ऋषिकेश राजपूतने पाँईटच्या डोक्यावरून चौकार ठोकून विजय मिळवून दिला. त्यात प्रभू शशस्त्राr 1 षटकार आणि 10 चौकारांसह 75 धावा तर ऋषिकेश राजपूतने 1 षटकार आणि 6 चौकारांसह 52 धावा,या दोघांनी अर्धशतके झळकविली. या जोडीने 128 धावांची चौथ्या गडय़ासाठी भागिदारी केली. सिद्धांत कदमने 20 तर, ऋषभ पाटीलने 16 धावा करून सुरेख साथ दिली. सुपर एक्सप्रेसतर्फे किरण बोकडे, आकाश असलकर, सिद्देश असलकर, हर्ष पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात एमसीसी संघाने प्रथम फलंदाजी करताना 24.4 षटकांत सर्वबाद 121 धावा केल्या. त्यात अभिषेक शंभूने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 40, रयान सनदीने 3 चौकारांसह 32 तर अंजुमने 19 धावा केल्या. साईराज हुबळी टायगर्सतर्फे शुजल पाटील, दर्शन मयेकर, आकाश कुलकर्णी, कार्तिक शिरूर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्त्युरादाखल साईराज हुबळी टायगर्सने 13.2 षटकांत 3 गडी बाद 125 धावा काढून सामना 7 गडय़ांनी जिंकला. त्यात नवनीत मराठेने 1 षटकार आणि 5 चौकारांसह 30, केदार उसुलकरने 3 षटकार आणि 2 चौकारांसह 20 चेंडूत 36, रोहन यारसिमीने 2 चौकारांसह 25 धावा केल्या. एमसीसीतर्फे मनिकांत बुकीटगार, भुवन, अमय पुजारी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे उमेश शर्मा, विठ्ठल गवस, दीपक नार्वेकर, नासीर सनदी यांच्या हस्ते प्रभू शशस्त्राr याला, दुसऱया सामन्यांत प्रणय शेट्टी, प्रवीण कुऱहाडे, परशराम पाटील यांच्याहस्ते केदार उसुलकर याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
मंगळवारचे सामने
1) सुपर एक्सप्रेस अर्जुन स्पोर्ट्स वि. सहारा स्पोर्ट्स यांच्यात सकाळी 9.30 वाजता, 2) एक्सेस इलाईट वि. अलोन स्पोर्ट्स यांच्यात दुपारी 1.30 वाजता.