इचलकरंजी / प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध ठिकाणी छापा टाकून जप्त केलेला दारू साठा चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरीची घटना गुरुवार रात्री साडे नऊ ते शुक्रवार सकाळी साडे नऊच्या दरम्यान राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात घडली. याबाबत शिवाजीनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सरकारी कार्यालयात जप्त केलेल्या मुद्देमालावरच चोरट्यांनी डल्ला मारल्याने शहरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयांचा सुरक्षा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली असून शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय सध्या भगतसिंग उद्यानाच्या पाठीमागील बाजूस सुरू आहे. या विभागाच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने विविध ठिकाणी छापा टाकून दारू साठा जप्त केला होता हा जप्त केलेला मुद्देमाल या कार्यालयात ठेवण्यात आला होता. या कार्यालयाचे कुलूप कशानेतरी तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ३ हजार ६६१ रुपये किंमतीच्या विविध कंपनीच्या व विविध क्षमतेच्या ५०९ बाटल्या चोरल्या. ही बाब शुक्रवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास उघडकीस आली. याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलिसात झाली आहे.









