त्वचेची ऍलर्जी असणाऱयांनी घ्यावी खबरदारी
कोरोना संक्रमणापासून बचावासाठी सद्यकाळात मास्कच उपयुक्त मानला जात आहे, परंतु दीर्घकाळापर्यंत मास्क परिधान करण्याचे अनेक तोटेही आहेत. अधिक काळापर्यंत मास्क परिधान केल्यास संवेदनशील त्वचा असणारे लोक एक्जिमाचे शिकार ठरू शकतात. यात खाज येण्यासाठी कोरडी आणि जाड त्वचा होते. हा एटोपिक डर्मटायटिसचाच प्रकार असल्याचे एका नव्या अध्ययनात नमूद करण्यात आले आहे.
अमेरिकन कॉलेज ऑफ ऍलर्जी, अस्थमा आणि इम्यूनोलॉजीच्या (एसीएएआय) वैज्ञानिकांकडून वार्षिक ऑनलाईन बैठकीत हे अध्ययन सादर करण्यात आले आहे. त्वचेची ऍलर्जी असणाऱया लोकांसाठी मास्कचा वापर नुकसानकारक ठरु शकतो. मास्कमुळे त्यांच्यात त्वचेसंबंधी समस्या पुन्हा तीव्र होऊ शकतात. कोरोनापूर्वी आम्ही अनेक लोकांच्या एक्जिमावर उपचार केला, त्यांना नाकासंबंधी ऍलर्जीही होती. काही काळानंतर आम्ही त्यांच्या आजारावर नियंत्रण मिळविले होते. परंतु कोरोना काळात मास्क वापरल्याने त्यांच्या समस्या पुन्हा वाढल्या. पूर्वी बरे असणाऱया शरीराच्या हिस्स्यातही ही ऍलर्जी फैलावल्याचे अध्ययनाचे लेखक आणि एसीएएआयचे सदस्य यशु धमीजा यांनी म्हटले आहे. मास्क संक्रमणापासून वाचवतो ही बाब खरी आहे, परंतु त्वचेची ऍलर्जी असणाऱया लोकांनी याचा वापर खबरदारीने करावा, असे उद्गार एसीएएआयच्या सदस्या क्रिस्टीन श्मिटलिन यांनी काढले आहेत.









