प्रतिनिधी/सोलापूर
सर्वांनी लसीकरण करून घ्यावे यासाठी शासनाकडून सातत्याने आवाहन केले जात आहे, पण प्रत्यक्षात लस उपलब्ध होत नसल्याने नागरिकांमधून ओरड सुरु आहे. ज्याप्रमाणे सोलापूर शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा होतो, त्याचप्रमाणे लसीचा पुरवठा होत असल्याचे दिसून येत आहे. लसीकरणात गोंधळ दिसून येत असलातरी महापालिका आरोग्य अधिकाऱयांनी उपलब्ध लसीचे सोलापूरसारखे उत्तम नियोजन कुठेच नसल्याचा दावा केला आहे.
इतर शहराच्या मानाने सोलापूरला कमी लस मिळत आहेत ही ओरड सुरुवातीपासून कायम आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे वारंवार तक्रार करुनही काहीच बदल होताना दिसत नाही. ज्यांना लस मिळत नाही अशांकडून महापालिका प्रशासनाच्या नियोजनाविषयी शंका व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे ज्यांना सहज लस मिळालीय त्यांच्याकडून मात्र महापालिकेच्या कारभाराविषयी समाधान व्यक्त केले जात आहे.
लसीकरणाची मोहिम पारदर्शकपणे राबविली जात आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन लसीकरणाचे आम्ही योग्य नियोजन करत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. अरुंधती हराळकर यांचे म्हणणे आहे. `शासनाकडून लस येणार आहे हे कळाले की आम्ही लगेच त्याचे नियोजन करतो. लसीचा पुरवठा झाला आहे, पण त्याचे नियोजन झाले नाही असे कधीच होत नाही. आलेली लस एका दिवसात संपते. विडी कामगारांसाठी लसीकरणाचे स्वतंत्र नियोजन केले आहे.’ असेही डॉ. हराळकर यांचे म्हणणे आहे. सोलापूर महापालिकेसारखे नियोजन कुठेच नसल्याचा दावा, आरोग्य अधिकारी डॉ. अरुधंती हराळकर यांनी केले आहे.
लस असेल तरच देऊ शकतो
शासनाकडून सोलापूरसाठी लस आल्या तरच आपण देऊ शकतो. इतर शहर आणि जिह्यांच्या मानाने सोलापूर शहरात लसीकरण अतिशय उत्तमरीत्या सुरू आहे. सोलापूर महापालिका लसीकरणाबाबत अतिशय उत्तमरित्या नियोजन केले जात आहे.
– डॉ. अरुंधती हराळकर, आरोग्य अधिकारी, सोलापूर महापालिका.









