पृथ्वीवर मंगळाच्या मुलींच्या विवाहात अडचण येते तशी आटपाट नगरात कोरोनाच्या मुलींच्या विवाहात अडचण येते. तिच्या पत्रिकेत कडक कोरोना होता. त्यामुळे तिची पत्रिका रेड झोनमधल्या मुलाच्या पत्रिकेशी जुळली. दोघांच्या घरातल्यांची बोलणी झाली. इमारतीच्या गच्चीवर एकेक मीटर अंतरावर चुन्याच्या फक्कीने चौकोन आखले. दोन्ही कुटुंबातली मंडळी त्या चौकोनात बसली. मग तिने आधी सॅनिटायझर आणून प्रत्येकाच्या हातावर टाकले. नंतर पोहे आणि शेवटी चहा. मुलाचे आईवडील, मामा व मुलाने आपापल्या मास्कआडून प्रश्न विचारले. जुन्या वळणाच्या स्त्रिया डोक्मयावरील पदर ढळू न देता बोलत त्याप्रमाणे तिने मास्क वर न करता सर्व प्रश्नांची शालीन शैलीत उत्तरे दिली. तिला गाणे गायला सांगितल्यावर तिने गाणे म्हटले,
नाही कशी म्हणू तुला वडा आणि पाव
पण आधी हाताला सॅनिटायझर लाव
मुलगी पसंत पडली हे दर्शवण्यासाठी मुलाच्या आईने मिठाईचा बॉक्स दिला. तिने त्यावर सॅनिटायझरचे दोन थेंब टाकून तो स्वीकारला आणि नियोजित सासू-सासऱयांच्या पाया पडली.
दुसऱया दिवशीपासून दोघे राजरोज इमारतीच्या पार्किंगमध्ये एक मीटर अंतरावरून भेटू लागले. एकदा बागेत फिरायला गेले. त्याने तिला गुलाबी मास्क भेट दिला. तिने त्याला ‘आय लव्ह यू’ अशी अक्षरे भरतकाम केलेला मास्क भेट दिला. अधिक सलगी त्यांनी सहसा केली नाही. एका महिनाअखेरीस बागेत बसलेले असताना तो तिला म्हणाला,
काढ सखे गळय़ातील तुझे चांदण्याचे हात
सॅनिटायझरचे थेंब आता महाग पडतात
मग त्यांच्या लग्नाची तारीख जवळ आली. देण्याघेण्याच्या गोष्टी झाल्या. मुलीकडच्यांनी-वरमाई, मुलाची आई, आजी व दोन आत्या-अशा पाचजणींना साडय़ा, साडीच्या पदरातून ब्लाऊज पीसेस व मास्क तसेच नवरदेवाला सूट व सुटाच्या कापडातून काढलेला मास्क द्यायचे ठरले. लग्नाच्या मांडवात वेगवेगळय़ा पारंपरिक भेटवस्तू मांडलेल्या होत्या. पण सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते सॅनिटायझरच्या रिकाम्या बाटल्या वापरून केलेल्या ताजमहालने.
लग्न पार पडले. तो आणि ती ग्रीन झोनमधल्या हिल स्टेशनवर मधुचंद्राला गेले. हिंदी सिनेमात नायक लोक सुहाग रात्री नायिकेचा घुंघट उठातात, त्याप्रमाणे त्याने तिचा मास्क वर केला. वगैरे. ते असो. दोघे आठ दिवसांनी परतले. यथावकाश तिने येऊ घातलेल्या बाळासाठी अंगडी-टोपडी आणि लोकरीचा मास्क करायला घेतला.








