शाळेत, कॉलेजात आणि नोकरीत असताना वेगवेगळय़ा ओळखी झाल्या. त्यातल्या बऱयाचशा फक्त ओळखी राहिल्या. अगदी थोडे मित्र-मैत्रिणी बनले.
कॉलेजात असताना बसने जायचो. बसमधला ग्रुप होता. तिघे एमईएस कॉलेजचे आणि मी फर्ग्युसनचा. बसमधून गुडलक हॉटेलजवळ उतरून आपापल्या कॉलेजला जायचो. कोणाच्याही खिशात पैसे असतील तर सर्वांनी कॉलेजला काडी लावायची आणि गुडलकमध्ये बसायचे असा नियम होता. त्या काळी गुडलक खरेखुरे इराणी हॉटेल होते. तिथे तासंतास निवांत बसता येई. त्या ग्रुपमध्ये दोन जणांशी वाद झाला. देवदास सिनेमा पाहिल्यावर सुन्न अवस्थेत गुडलकमध्ये बसलेलो असताना एकजण बोललेला, “देवदासचा रोल राजकुमारने चांगला केला असता.’’ दुसरा एक राज कपूरचा पंखा होता. राज कपूर गोरापान निळय़ा डोळय़ांचा आहे आणि इंग्रजी सिनेमात गेला तर अख्खं जग खिशात घालील अशी त्याची श्रद्धा. सतत तो राज कपूरचा विषय काढायचा. राज कपूरला जेम्स बॉन्डची भूमिका जमेल का? ‘माय नेम इज बॉन्ड, जेम्स बॉन्ड’ हा डायलॉग तो कसा म्हणेल? वगैरे विचारल्यावर तो उचकला. एकाने राज कपूरची नक्कल करीत “मेरा नाम बॉन्ड है जी, जेम्स बॉन्ड’’ म्हटल्यावर तो चिडून ग्रुप सोडून गेला. आता या किरकोळ गोष्टींवरून भांडण केल्याचे हसू येते आणि वाईट वाटते. सोशल मीडियावर विविध नेत्यांची बाजू घेऊन भांडणाऱयांनादेखील काही वर्षांनी असे वाटेल. अपवाद अर्थात पेड ट्रोल्सचा.
तालमीत जाऊन नियमित व्यायाम करणाऱयांचा देखील एक ग्रुप होता. शायरी वाचणाऱया आणि जुनी गाणी, गझला आवडणाऱयांचाही एक ग्रुप होता.
वरील तिन्ही गटात सुनील सामायिक मित्र होता. मला सर्वाधिक जवळचा. आम्हा सर्वात अधिक सुखवस्तू घरातला, सत्तरच्या दशकात चेतक स्कूटर बाळगणारा, केव्हाही उसने पैसे देऊन परत न मागणारा, देखणा, बलदंड आणि कॅरमपटू. त्याचे हिशेब कुठे चुकले, समजले नाही. कॉलेजनंतर सर्वांचे संपर्क तुटले होते. सुनील आर्थिक हलाखीत आणि एकाकी अवस्थेत गेला. गेल्यानंतर काही महिन्यांनी आम्हाला समजले.
रोज कोरोनाच्या बातम्या वाचतो-बघतो तेव्हा मनात धाकधूक असते. माझे अनेक प्रिय मित्र-मैत्रिणी लॉकडाऊनमध्ये कुलूपबंद आहेत. कोणी सहकुटुंब, कोणी एकटे. सुनीलसारखी कोणाचीच बातमी येऊ नये. देव दयाळू असेल तर.








