चोरीच्या भीतीने शहरातून बाहेर पडत आहेत कंपन्या
कोरोना काळामुळे जगभरासाठी मागील दीड वर्ष अत्यंत आव्हानात्मक राहिले आहे. पण एक शहर वेगळय़ाच स्तरावरील समस्यांना तोंड देत आहे. या शहराची समस्या विक्राळ झाल्याने स्थानिक लोकच नव्हे तर तेथील रिटेल स्टोअर्सची स्थितीही बिघडली आहे.
अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को शहर स्वतःच्या झगमगाटासाठी ओळखले जाते, पण मागील काही काळापासून या शहरातील रिटेल स्टोअर्समध्ये चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ दिसून आली आहे. प्रसिद्ध रिटेल स्टोअर वॉलग्रीन्सच्या रिटेल स्टोअरमधील चोरीच्या घटना वाढल्याने कंपनीने येथील स्वतःची 17 स्टोअर्स बंद केली आहेत.
वॉलग्रीन्स स्टोअरमधील चोरीच्या एका घटनेची चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक व्यक्ती सायकलवर स्वार होत ब्लॅक पॉलिथीमध्ये सामान भरत असल्याचे तेथे उपस्थित महिला आणि एक व्यक्ती याचे चित्रण करताना यात दिसून येते. चोर सामान गोळा करून स्वतःच्य सायकलवरून निघून जातो आणि तेथे उपस्थित लोकांना काहीच करता आले नाही.
सॅन फ्रान्सिस्को मागील काही काळात संघटित रिटेल गुन्हय़ांचे केंद्र ठरले आहे. अनेक चोरी करणारे लोक या स्टोअरच्या नजीकच चोरीचा माल विकतात. वेगाने वाढणाऱया या घटनांसाठी बेरोजगारीला जबाबदार मानले जात आहे. पण याचबरोबर एक कायदाही यासाठी कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते.
2014 मध्ये कॅलिफोर्नियात एक कायदा संमत झाला होता, ज्यानुसार 950 डॉलर्सपेक्षा कमी किमतीच्या वस्तूंच्या चोरीला किरकोळ गुन्हा मानण्यात येते. कोरोनाकाळात वाढती बेरोजगारी आणि कायद्यातील या त्रुटीचा लाभ घेत अनेक जण शॉप लिफ्टिंग करत आहेत.









