मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटमधून दिली आहे. राज्यातील पोलीस दलात वरिष्ठ पातळीवर झालेल्या बदलावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘मुंबई तसेच महाराष्ट्र पोलिस दलास नवे नेतृत्व मिळाले आहे. आपल्या पोलीस दलाची परंपरा महान आहे. एकाद्या वावटळीत पोलीस दलाची पडझड होईल या भ्रमात कोणीच राहू नये. खाकी वर्दीचा मान व शान यापुढील काळात अधिक हिमतीने व सचोटीने राखला जाईल हीच अपेक्षा.’
अटकेत असलेले मुंबई पोलीस दलातील निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्या स्फोटक प्रकरणात महाराष्ट्र पोलीस दलात ही मोठी घडामोड घडली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून परमबीर सिंग यांची उचलबांगडी होणार अशी जोरदार चर्चा होती. ती अखेर खरी ठरली आहे. महाराष्ट्राच्या विशेषतः मुंबईतील पोलीस दलात मोठे बदल आज झाले आहेत.