सेवानिवृत्त कॅप्टन नौकुडकर यांचे प्रतिपादन : खानापुरात सेवानिवृत्त सैनिक संघटना बळकटीबाबत चर्चा
वार्ताहर /खानापूर
भारतीय सैन्यात जसा समानता दर्शवणारा गणवेश विचारांची योग्य दिशा ठरवतो, तसेच सेवानिवृत्तीनंतरही प्रत्येक सैनिकाने जात, पात, धर्म न मानता समाजासाठी झटले पाहिजे. जसा गणवेश तसे एकात्मतेची विचारधाराही प्रत्येकाच्या मनात कायम जागृत असली पाहिजे, असे विचार बेळगाव जिल्हा सेवानिवृत्त सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅ. नौकुडकर यांनी व्यक्त केले. मंगळवारी खानापूर तालुका आर्मी, नेव्ही, एअरफोर्स माजी सैनिक संघटनेच्यावतीने आयोजित वार्षिक सर्वसाधारण बैठकीत बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग मेलगे
होते.
तालुका संघटनेचे सचिव गोपाळ देसाई यांनी प्रास्ताविक व स्वागत करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी तालुका संघटनेमध्ये दिवसेंदिवस नवीन सभासदांची नोंद होत आहे. यामध्ये नव्याने दाखल झालेले सुभेदार मेजर मनोहर बाबुराव कंग्राळकर व चंद्रकांत बाबुराव पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना मच्छे येथील माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅ. पुंडलिक बाळेकुंद्री म्हणाले, भारतीय सेनेत काम करणाऱया सैनिकांचा देशाभिमान कायम असतो, पण निवृत्तीनंतरच्या काळातही समाजहितासाठी त्यांनी वाहून घेतले पाहिजे.
संपूर्ण देश किसान आणि जवान यांना मानतो. त्याचा आदर आपण राखून समाजाप्रती आपली सेवा तसेच संघटनात्मक कार्य करण्यासाठी झटले पाहिजे. खानापूर तालुक्मयात अनेक सैनिक आहेत. सैनिक संघटनेने स्वतःचे एक भवन उभारून त्याअंतर्गत तालुक्मयातील सर्व आजी-माजी सैनिकांना संघटित करून अडीअडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी आपलाही हातभार असेल, असे विचार मांडले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना निवृत्त कॅ. पांडुरंग मेलगे म्हणाले, खानापूर तालुक्मयात गेल्या अनेक वर्षांपासून आर्मी, नेव्ही, एअरफोर्स दलातील सर्व निवृत्त सैनिकांना संघटित करून सैनिकांच्या समस्या सामूहिकरीत्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहोत. सेवानिवृत्तीनंतरच्या काळात आरोग्यविषयक सुविधा आहेत. त्या मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचे विचार त्यांनी मांडले.
यावेळी पत्रकार वासुदेव चौगुले, पिराजी कुराडे यांनीही विचार मांडले. कार्यक्रमाला निवृत्त सुभेदार हनुमंत गुरव, शिवाजी चौगुले, नारायण झुंजवाडकर, नारायण हुंदरे, राजाराम गुरव, गणपती पाटील, राजाराम पाटील, प्रकाश गवसेकर, संतान आदी उपस्थित होते. सचिव धाकलू हेब्बाळकर यांनी आभार मानले.









