प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील मारुती मंदिर येथे स्टेडियममागे भाजी मार्केटकडे जाणाऱया रोडवर एका रात्रीत 5 खोके उभे राहिल्याने येणाऱया-जाणाऱयांच्या नजरा त्याकडे टवकारल्या आहेत. नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंडय़ा साळवी म्हणतात खोके कुणी टाकले ते मला माहित नाही, मग या प्रकाराला आशीर्वाद तरी कोणाचा, अशा विरोधकांच्या ना-ना सवालांनी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गुऱहाळ माजले.
रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंडय़ा साळवी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. त्यावेळी या सभेत मारुती मंदिर येथील जुन्या आरटीओ कार्यालयाजवळील म्हणजेच स्टेडियम पाठीमागे जाणाऱया रोडवरील उभारलेल्या नव्या खोक्यांचा विषय चर्चेला उपस्थित झाला. या रस्त्याच्या बाजूची अतिक्रमणे यापूर्वी पालिकेने हटवली होती. रस्त्याजवळ बसणाऱया भाजी विक्रेत्यांनाही हटवून पाठीमागे बसवण्यात आले होते. त्यावेळी या विषयावरून जोरदार राजकारणाने उचल खाल्ली होती.
यापूर्वी अतिक्रमणे हटवण्यात आलेली असताना त्याच ठिकाणी अनधिकृतपणे 4 नवीन खोके उभारण्यात आलेत. हा विषय काही दिवस जोरदार चर्चिला जात आहे. मात्र त्यावर उघड कोणी बोलत नव्हते. कोणाच्या आशीर्वादाने हे खोके उभारण्यात आले. पण नगर परिषदेच्या गुरूवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्ष असलेल्या भाजपाच्या नगरसेवकांनी त्या विषयावर बोट दाखवले. त्या बाबत नगराध्यक्ष साळवी यांना विचारणा करण्यात आली. पण त्यांनी आपणाला माहित नसल्याचे सांगितले. त्यामुळे ते खोक्यांच्या विषयावरून सभेलाही चांगलाच रंग चढला. अलिकडे शहरात मोक्याच्या जागांमध्ये खोके मिळण्यावरून अंतर्गत चढाओढही सुरू आहे. सत्ताधाऱयांच्या जवळच्यांचा यात हात असल्याची चर्चा आहे. यामध्ये अनेक दिग्गजांची नावे पुढे येत आहेत. याला आशीर्वाद कोणाचा, असा सवाल आता उपस्थित करण्यात आला. त्या बाबत कोणताच ठोस उत्तर न देता सत्ताधारी व प्रशासनाने या विषयाला बगल दिली.
जिल्हाधिकाऱयांकडे दाद मागणार
शहरातील मोक्याच्या जागी एका रात्रीत शहरात पाच अनधिकृत खोकी उभे राहणे पूर्णतः चुकीचे आहे. पालिकेच्या सभेत हा विषय नगराध्यक्षांना विचारणा केली. पण मला माहित नसल्याचे नगराध्यक्ष सांगतात. त्या बाबत मी माहिती घेऊन सांगतो. आम्ही या विरोधात जिल्हाधिकाऱयांकडे दाद मागणार आहोत.









