वृत्तसंस्था/ ढाक्का
यजमान बांगलादेश आणि झिंबाब्वे यांच्यात येथे सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात रविवारी खेळाच्या दुसऱया दिवसाअखेर बांगलादेशची स्थिती भक्कम असल्याचे दिसून येते. या कसोटींत झिंबाब्वेचा पहिला डाव 265 धावांत आटोपल्यानंतर बांगलादेशने पहिल्या डावात 3 बाद 240 धावा जमविल्या. नजमूल हुसेन आणि कर्णधार मोमीनूल हक यांनी शानदार अर्धशतके झळकविली.
झिंबाब्वेने 6 बाद 228 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांचे शेवटचे चार गडी 37 धावांची भर घालत तंबूत परतले. बांगलादेशच्या जायेद आणि टी इस्लाम यांनी झिंबाब्वेची शेपूट गुंडाळली. झिंबाब्वेच्या चेकाबेव्हाने 30 तर कर्णधार एर्वीनने 107 धावांचे योगदान दिले. बांगलादेशच्या नईम हसनने 70 धावांत 4 तर टी इस्लामने 90 धावांत 2 गडी बाद केले. अबु जायेदने 71 धावांत 4 गडी मिळविले.
यजमान बांगलादेशने आपल्या पहिल्या डावाला सावध सुरूवात केली. सलामीच्या तमीम इक्बालने 41 धावा जमविल्या. झिंबाब्वेचा टिर्पेनोने त्याला यष्टीरक्षककरवी झेलबाद केले. झिंबाब्वेतर्फे कसोटी पदार्पण करणाऱया शुमाने बांगलादेशच्या नजमूलला बाद करत आपला कसोटीतील पहिला बळी मिळविला. नजमूलने 139 चेंडूत 7 चौकारांसह 71 धावा जमविल्या. कर्णधार मोमीनूल हक 9 चौकारांसह 79 धावांवर खेळत आहे. झिंबाब्वेच्या नेयुचीने सलामीच्या सैफ हसनला 8 धावांवर बाद केले. दुसऱया दिवसांअखेर बांगलादेशचा संघ 25 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 7 गडी खेळावयाचे आहेत.
संक्षिप्त धावफलक
झिंबाब्वे प. डाव सर्वबाद 265 (एर्वीन 107, चेकाबेव्हा 30, अबु जायेद 4-71, नईम हसन 4-70, टी इस्लाम 2-90),
बांगला देश प. डाव- 3 बाद 240 (मोमीनूल हक खेळत आहे. 79, नजमूल हुसेन 71, सैफ हसन 8, तमीम इक्बाल 41).









