एका राज्यात एक राजा राज्य करायचा. राजा खूप श्रीमंत होता आणि त्याच्या राज्याचा पसारा हळूहळू वाढत होता. राजाला दोन राण्या होत्या. त्या दोन्ही राण्यांनी काही काळाने राजपुत्रांना जन्म दिले. राजाला खूप आनंद झाला. संपूर्ण राज्यात हत्तीवरून मिठाई वाटण्यात आली. राजपुत्रांच्या नावाने दोन नगरे राज्याच्या पूर्वेला आणि पश्चिमेला वसवण्यात आली. काही वर्षांनी राजपुत्र तरुण झाल्यावर राजाने राज्याचा विस्तार करणे थांबवले. राजाने विस्तार करणे थांबवले पण विकास आणि प्रगती करणे थांबवले नाही. एके दिवशी राज्याच्या सेनापतीने राजाला विचारले की, “महाराज आपण चक्रवर्ती सम्राट होऊ शकता. मग आपण राज्याचा विस्तार करणे थांबवलेत का?’’ राजाने सेनापतीस विचारले की, “राज्याचा विस्तार वाढवायचा का?’’ सेनापतीला आश्चर्य वाटले. सेनापतीने अतिशय नम्रतेने राजाला पुन्हा विचारले की, “महाराज, आपण जर राज्याचा विस्तार वाढवला तर आपल्या दोन्ही राजपुत्रांना खूप मोठे राज्य उपभोगायला मिळेल.’’ राजाने सेनापतीस पुन्हा विचारले की, “खूप मोठे राज्य म्हणजे किती?’’ त्यावर सेनापती म्हणाला की, “खूप मोठे राज्य म्हणजे संपूर्ण पृथ्वीचे राज्य त्यांना उपभोगायला मिळेल.’’ त्यावर राजा किंचित हसला आणि सेनापतीस म्हणाला की, “पृथ्वीचे राज्य जरी माझ्या राजपुत्रांना उपभोगायला मिळाले तरीही ते समाधानी राहतील का?’’ सेनापती म्हणाला की, “ते अवश्य समाधानी राहतील.’’ त्यावर राजाने विचारले, “समाधान कशावर अवलंबून आहे?’’ सेनापतीने उत्तर दिले की, “समाधान हे पराक्रमावर अवलंबून आहे.’’ राजाने पुन्हा तोच प्रश्न विचारला की, “सेनापती, समाधान कशावर अवलंबून आहे.’’ सेनापतीने तेच उत्तर दिले की, “महाराज, समाधान हे पराक्रमावर, स्वतःच्या पुरुषार्थावर अवलंबून आहे.’’ राजाने सेनापतीस आठ दिवसांनी भेटण्याची आज्ञा दिली. सेनापतीने आठ दिवसांनी राजाला भेटायचे ठरवले.
त्या आठ दिवसात अचानक राज्याच्या सीमेवर दुसऱया लहानशा राज्याच्या सैनिकांनी किरकोळ हल्ला केला. ही बातमी सेनापतीस समजली. सेनापतीने तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली. त्याने सैन्याला आदेश दिला आणि सीमेवर शत्रूच्या सैनिकांवर प्रतिहल्ला करण्यास सांगितले. सैनिकांनी आज्ञेचे पालन करण्याकरिता हल्ला केला. हा प्रती हल्ला मात्र शत्रूच्या सैनिकांनी उधळून लावला. सेनापतीला ही बातमी कळताच त्याचा संताप अनावर झाला. त्याने स्वतःहून राज्याच्या सीमेवर जाण्याचे ठरवले. सेनापतीने सीमेवर शत्रू सैन्यावर हल्ला केला. युद्धाला सुरुवात झाली. सेनापतीचे दुर्दैव असे की त्यालासुद्धा पराभवाचे तोंड पहावे लागले. ही बातमी राजाला समजली राजाने दोन्ही राजपुत्रांना सीमेवर जाऊन कारवाई करण्याची आज्ञा दिली.
दोन्ही राजपुत्र सीमेवर दाखल झाले. त्यांनी सेनापतीकडून युद्धजन्य परिस्थितीचा आढावा घेतला आणि दुसऱया दिवशी सकाळी रणांगणावर जायचे ठरवले. पुन्हा दुसऱया दिवशी घनघोर युद्धास प्रारंभ झाला. शत्रूसैन्य प्राणपणाने लढत होते पण त्यांचा टिकाव लागला नाही आणि शेवटी राजपुत्रांचा विजय झाला. मोठय़ा राजपुत्राने संपूर्ण सैन्याचे आभार मानले, त्यांच्या शौर्याची जाणीव ठेवली. परंतु, सुरुवातीला आपल्या सेनापतीला पराभव स्वीकारावा लागला म्हणून त्या राजपुत्राने संपूर्ण सैन्याला शिक्षा म्हणून काही दिवसांचा पगार द्यायचा नाही असे ठरवले आणि तो राजधानीत गेला. लहानग्या राजपुत्राने मात्र मोठा राजपुत्र राजधानीत गेल्यावर सीमेवरील आपल्याच सैन्याला शिक्षा देण्याचे ठरवले. त्याने शिक्षा म्हणून संपूर्ण सैन्यातील प्रत्येक सैनिकाचा डावा हात छाटण्याचा आदेश दिला. या दोन्ही राजपुत्रांचे आदेश राजाला समजले आणि त्याने हे दोन्ही आदेश रद्द केले त्यामुळे सैनिकांनी राजाचा जयजयकार केला. आठ दिवसांनी सेनापती राजाला भेटला. त्यानेसुद्धा राजाचे आभार मानले. राजाने त्याला घडलेल्या घडामोडींविषयी विचारले आणि राजा म्हणाला की, “अजूनही, तुम्हाला असे वाटते का की आपण संपूर्ण पृथ्वीवर आपले राज्य निर्माण करावे?’’ सेनापतीला राजाच्या बोलण्याचा अर्थ समजला. राजाला स्वतःच्या राज्याची, तेथील नागरिकांची आणि सैन्याची जाणीव असल्याने तो सतत त्यांची काळजी वाहत असे. मोठय़ा राजपुत्राला केवळ सैन्याच्या शौर्याची जाणीव होती पण त्यांच्या कुटुंबीयांच्या परिस्थितीची उणीव होती. लहानग्या राजपुत्राला मात्र राज्याची, तेथील नागरिकांची आणि सैनिकांच्या त्यागाची जाणीव नव्हती तर उणीव होती. म्हणूनच राजाने स्वतःच्या राज्याचा विस्तार वाढवला नाही.
व्यवस्थापनशास्त्रांत सुद्धा कामगार, कर्मचारी, अधिकारी, संचालक मंडळ आणि मालक ह्यांनी एकमेकांची अंतःकरणे सांभाळणे खूप गरजेचे आहे. तरच ते उत्तम व्यवस्थापन करू शकतील. श्री समर्थांनी अंतःकर्णयेक समासात याविषयी सांगितले की,
अंतःकर्ण म्हणिजे जाणीव!जाणीव जाणता स्वभाव!देहरक्षणाचा उपाव!
जाणती कळा !!सर्प जाणोनी डंखू आला!
प्राणी जाणोन पळाला!दोहींकडे जाणीवेला!
बरें पाहा !!दोहींकडे जाणीवेसी पाहिलें!
तरी अंतःकर्ण येकचि जालें!विचारीतां प्रत्यया आलें !जाणीवरूपें !! 12-13-14/01/10
ह्याचा अर्थ असा आहे की, अंतःकरण म्हणजे जाणीव. जाणीव म्हणजे जाणण्याची स्वाभाविक क्रिया किंवा नैसर्गिक प्रक्रिया होय. ह्या जाणिवेनेच देहरक्षणाचा उपाय प्राण्याला सुचतो. एकीकडे जाणीवेनेच सर्प दंश करण्यास येतो आणि त्याच जाणीवेने दुसरा प्राणी दूर पळतो. दोन्हीकडे जाणीव मात्र सारख्याच प्रमाणात असते. दोन्हीकडे जाणीवेला जर पहिले तर अंतःकरण एकच असते. विचार केल्यास हे जाणवेल की सर्व प्राण्यांचे अंतःकरण एकच असते.
व्यवस्थापनशास्त्राच्या दृष्टीने विचार केल्यास ह्या ओवींचा अर्थ असा आहे की, एखाद्या आस्थापनेत, संस्थेत किंवा उद्योग समूहात जे घटक कार्यरत आहेत त्यांना आपल्या संस्थेच्या अस्तित्वाची जाणीव असणे गरजेचे आहे. कारण त्याशिवाय ते समविचारी म्हणजेच त्यांचे अंतःकरण एक होऊ शकत नाही. ही जाणीव जर उद्योग संस्थेतील कामगार, कर्मचारी, अधिकारी, संचालक मंडळ आणि संस्थापक यांच्यात असेल तर ते स्वतःच्या संस्थेचे अस्तित्व टिकवू शकतात. संस्थेच्या अस्तित्वाच्या जाणीवेपोटीच संस्थेतील एखादा घटक काही कृती करत असेल तर ती कृती योग्य आहे की अयोग्य हे इतर घटक जाणीवेपोटीच ठरवत असतात. जाणीव ही सर्वत्र एकच आहे. त्यामुळे उद्योग संस्थेतील सर्वांचे अंतःकरण एकच असायला हवे. श्रीसमर्थांनी अंतःकर्णयेक समासात अंतःकरण म्हणजे नेमके काय ह्याचे उत्तम विवेचन केलेले आहे. ज्याचा उपयोग व्यवस्थापनशास्त्रात केला जाऊ शकतो. श्रीसमर्थ सांगतात की अंतःकर्ण म्हणजे विष्णुस्वरूप आहे. कारण त्यात जाणीव असते. नेणिव म्हणजे संपूर्ण संहारक असल्याने रुद्रस्वरूप आहे. तसेच जाणीव आणि नेणिव ह्यांचे अनेक ठिकाणी मिश्रण असते. जाणीव आणि नेणिवेचे मिश्रण हे उत्पत्तीकर्ता ब्रह्मस्वरूप आहे. व्यवस्थापनशास्त्रात जाणीव, नेणिव, जाणीव आणि नेणिवेचे मिश्रण या तिन्ही स्थिती नेहमीच बघायला मिळत असतात. औद्योगिक संस्थेतील काही कर्मचारी हे अतिशय जाणिवेने कार्य करत असतात. ते आपापल्या संस्थेशी एकनि÷ असतात. संस्थेचे हित ते आपले हित अशी त्यांची भावना असते. उद्योग समूहातील काही कर्मचाऱयांना कुठल्याच प्रकारच्या कार्याची जाणीव नसते. ते नवीन जबाबदारी स्वीकारण्यास तयार नसतात. त्यांना नेणिव असते. औद्योगिक संस्थेतील काही कर्मचारी हे कधी जाणिवेने कधी नेणिवेने कार्य करतात. यात संस्थेचे हित काही प्रमाणात असते. आपल्यासहित आपल्या संस्थेचे हित व्हावे अशी इच्छा ज्या कर्मचाऱयांना असेल त्यांचेच अंतःकरण संस्थेच्या ध्येयाशी एकरूप झाले आहे असे समजावे.
ज्यांना स्वतःचा उद्योग समूह स्थापन करायचा असेल त्यांनी सातत्याने छ. शिवाजी महाराजांचे चरित्र आणि श्रीसमर्थांचा दासबोधाचा सातत्याने अभ्यास करावा. सर्व वाचकांना शिवजयंतीच्या आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा!
माधव किल्लेदार








