मुंबई/प्रतिनिधी
एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना पुण्यातील भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीने गेल्या आठवड्यात अटक केली होती. गिरीश यांची ईडीकडून चौकशी सुरुच असून त्यांच्या कोठडीत आता वाढ करण्यात आली आहे. आता १५ जुलैपर्यंत त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे.या प्रकरणाशी संबंधित असलेल्या आणखी काही लोकांचे जबाब नोंदवण्याचं काम सध्या सुरु आहे आणि चौधरी यांची आणखी चौकशी करणं गरजेचं आहे, असं ईडीने न्यायालयाला सांगितलं.
ईडीच्या आरोपानुसार २०१६ मध्ये खडसे महसूलमंत्री असताना पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसीच्या मालकीची जमीन गिरीश यांच्या नवे विकत घेतली गेली होती. पुण्यातील एका व्यावसायिकाने या व्यवहाराविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीच्या आधारे चौकशी, तपास करून खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी, गिरीश यांच्यासह जागेचे मूळ मालक अब्बार उकाणी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता.
या तक्ररीच्या आधारावर ईडीने समांतर तपास सुरू केला. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ईडीने खडसे कुटुंबीयांविरोधात गुन्हा (ईसीआयआर) नोंदवला होता. दरम्यान जावयाला अटक केल्यानंतर एकनाथ खडसे यांना पुन्हा ईडीने पुन्हा समन्स जारी करत चौकशीस हजर राहण्याची सूचना केली होती. तसेच त्यांनतर त्यांच्या पत्नी मंदाकिनी यांनाही ईडीने समन्स जारी करत चौकशीस हजर राहण्याची सूचना केली आहे.