सामनावीर-मालिकावीर पुरस्काराचा संयुक्त मानकरी जलद गोलंदाज शाहीन आफ्रिदीचे सामन्यात 10 बळी
किंग्स्टन / वृत्तसंस्था
जलद गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने सामन्यात 10 बळी घेतल्यानंतर पाकिस्तानने यजमान विंडीजचा 109 धावांनी धुव्वा उडवला आणि 2 सामन्यांची ही मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. या दुसऱया व शेवटच्या कसोटीत विजयासाठी 329 धावांचे लक्ष्य असताना विंडीजचा दुसरा डाव सर्वबाद 219 धावात आटोपला. शाहीन आफ्रिदीने पहिल्या डावात 51 धावात 6 तर दुसऱया डावात 43 धावात 4 बळी घेतले. पाकिस्तानविरुद्ध 2001 नंतर पहिला कसोटी मालिकाविजय नोंदवण्यासाठी विंडीजला आणखी प्रतीक्षा करावी लागेल, हे या निकालाने स्पष्ट झाले.
येथील दुसऱया लढतीत शेवटच्या दिवशी विजयासाठी पाकिस्तानला 9 गडी बाद करण्याची तर विंडीजला 280 धावा जमवण्याची आवश्यकता होती. विंडीजने 1 बाद 49 या मागील धावसंख्येवरुन डावाला पुढे सुरुवात केली. मात्र, अल्झारी जोसेफ (17) दुसऱया गडय़ाच्या रुपाने बाद झाला आणि विंडीजच्या डावाला तेथून गळती लागली. विंडीज फलंदाजांची खराब फटक्यांची निवड त्यांना पराभवाच्या खाईत लोटणारी ठरली.
हसन अलीला मंगळवारपर्यंत या मालिकेत अजिबात सूर सापडला नव्हता. पण, मालिकेतील निर्णायक, शेवटच्या दिवशी त्याने अतिशय धारदार मारा साकारत 14 षटकात 37 धावात 2 बळी घेतले. नौमन अलीने देखील 52 धावात 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. अल्झारीला 17 धावांवर परतावे लागले तर बॉनर (2), रॉस्टन चेस (0) यांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही.
जर्मेन ब्लॅकवूड (54 चेंडूत 25) व काईल मेयर्स (53 चेंडूत 32) यांनी डाव सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. शिवाय, अनुभवी जेसॉन होल्डरने 83 चेंडूत 47 धावा जमवत डावातील सर्वाधिक धावसंख्या नोंदवली. मात्र, त्यानंतर तळाच्या क्रमवारीतील जोशुआ सिल्वा (15), केमर रोश (7) देखील स्वस्तात बाद झाले आणि विंडीजचा डाव 83.2 षटकात सर्वबाद 219 धावांमध्येच आटोपला.
सामन्यात 10 बळी घेणारा शाहिन आफ्रिदी सामनावीर व मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या मालिकेतील पहिली कसोटी विंडीजने जिंकत आघाडी घेतली होती. मात्र, येथे पाकिस्तानने त्याचा हिशेब चुकता करत दमदार विजय नोंदवला आणि ही मालिका 1-1 फरकाने बरोबरीत सोडवली.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान पहिला डाव ः 9-302 घोषित. विंडीज पहिला डाव ः सर्वबाद 150. पाकिस्तान दुसरा डाव ः 6 बाद 176 घोषित. विंडीज दुसरा डाव (टार्गेट 329)ः सर्वबाद 219. (जेसॉन होल्डर 83 चेंडूत 47, क्रेग ब्रेथवेट 147 चेंडूत 39, काईल मेयर्स 53 चेंडूत 32, ब्लॅकवूड 54 चेंडूत 25, केरॉन पॉवेल 41 चेंडूत 23. शाहीन शाह आफ्रिदी 17.2 षटकात 43 धावात 4 बळी, नौमन अली 3-52, हसन अली 2-37).









