क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
आम्ही एएफसी चॅम्पियन्स लीगमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा ठेवली आहे. भारताचा पहिला प्रतिनिधी म्हणून एफसी गोवा या स्पर्धेत निश्चितच चांगली कामगिरी करेल. या स्पर्धेतील लढतींसाठी आम्ही आतूर आहोत, असे एफसी गोवाचा प्रशिक्षक स्पेनचा एदू बेडिया प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाला.
एएफसी चॅम्पियन्स लीगमध्ये क्लबची कामगिरी कशी असणार आणि आयएसएलच्या तुलनेत स्पर्धा सुरू होण्यापूर्वी संघ कसा आकार घेत आहे याबद्दल बेडियाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आयएसएल स्पर्धेत खेळणारे असे संघ आहेत, जे बऱयाच प्रमाणात समान आणि संतुलित आहेत. परंतू आता आम्ही वेगळय़ा स्तरावर खेळणार आहोत. पर्सेपोलिसने शेवटच्या मोसमात अंतिम फेरी गाठली आणि सर्व संघ खूप स्पर्धात्मक आहेत. आम्ही या स्पर्धेसाठी बऱयाच तीव्रतेसह प्रशिक्षण घेत आहोत आणि आम्हाला शक्य तेवढे स्पर्धात्मक रहायचे आहे, असे बेडिया म्हणाला.
मी व्यक्तिशा ला-लीगामध्ये चार वर्षे घालविली आहेत. ला-लीगामधील संघ आमच्यापेक्षा दर्जेदार आहेत. आमचेही खेळाडू चांगल्या संघांविरूद्ध तसेच खेळाडूंविरूद्ध खेळले आहेत. आमचे खेळाडू मानसिकदृष्टय़ा तयार आहेत, असे एदू बेडिया म्हणाला. आम्हाला आयएसएल स्पर्धेनंतर थोडी विश्रांती आवश्यक होती व ती आम्हाला मिळाली. आता आम्ही या स्पर्धेसाठी ताजेतवाने झालो आहोत. या स्पर्धेवर आमचं लक्ष आहे आणि आम्हाला मिळालेल्या संधीचा फायदा घ्यायचा आहे, असे बेडिया म्हणाला. आपण कसे खेळतो याविषयी आपण हुशार असले पाहिजे. या स्पर्धेतील सहभागी आमच्यापेक्षा बलवान असतील, परंतू आम्हाला आमची शैली जुळवून घ्यावी लागेल आणि आपल्या खेळाच्या काही बाबी बदलाव्या लागतील, मात्र आम्ही स्पर्धेतील सहभागी संघांना प्रखर झुंज देणार असून प्रतिस्पर्धी संघासाठी शक्य तितकी कठीण परिस्थिती बनवू, असे एदू बेडियाने संघ या स्पर्धेत आपल्या खेळाची शैली बदलणार का, या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले. आम्ही घरच्या मैदानावर खेळत असल्याने हा एक फायदाही आमच्यासाठी असू शकतो. कारण हवामान आणि या स्टेडियम्सवर खेळण्याचा जास्त अनुभवही आम्हाला आहे. मात्र, ज्या दिवशी जो संघ चांगला खेळ करेल, तो निश्चितपणे जिंकेल, असे बेडिया म्हणाला. स्पर्धेत एफसी गोवा आपल्या मोहिमेची सुरूवात 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता अल-रेयानविरूद्धच्या लढतीने करेल.









