वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2027 मध्ये होणाऱया एएफसी आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारतासह पाच देशांनी अर्ज दाखल केले आहेत, असे एएफसीने जाहीर केले.
आशियातील ही प्रमुख फुटबॉल स्पर्धा असून भारताव्यतिरिक्त इराण, सौदी अरेबिया, उझ्बेकिस्तान यांनीही यजमानपदाची मागणी केली आहे. ‘यजमानपदासाठी इच्छुक असणाऱया सर्व सदस्य संघटनांच्या अर्जांची व त्यांनी पुरविलेल्या कागदपत्रांची छाननी करून पुढील वर्षी यजमान देशाची घोषणा करण्यात येईल,’ असे एएफसीने मंगळवारी निवेदनाद्वारे सांगितले. आशियाई चषक स्पर्धेला पाठिंबा दर्शविल्याबद्दल एएफसी अध्यक्ष शेख सलमान बिन इब्राहिम अल खलिफा यांनी पाचही सदस्य देशांचे आभार मानले आहेत.
ज्या पाच देशांनी या स्पर्धेच्या यजमानपदासाठी उत्सुकता दाखविली आहे, त्यापैकी दोन देशांनी याआधी दोनदा या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. 1956 मध्ये या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली होती. विद्यमान चॅम्पियन कतारने 1988 व 2011 मध्ये ही स्पर्धा भरविली होती तर इराणने 1968 व 1976 मध्ये त्याचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे घरच्या मैदानावर आयोजित केलेली स्पर्धा दोन्ही वेळेस जिंकण्याचा पराक्रम इराणने केला आहे. तीन वेळचे चॅम्पियन्स सौदी अरेबिया व भारत तसेच उझ्बेकिस्तान पहिल्यांदाच ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भारताला 2022 मधील एएफसी महिला आशियाई चषक तर उझ्बेकिस्तानला या वर्षीची एएफसी यू-19 चॅम्पियनशिप स्पर्धा भरविण्याची संधी मिळाली आहे.









