प्रयागराजमध्ये बाहुबली नेता लढविणार निवडणूक
वृत्तसंस्था/ प्रयागराज
उत्तरप्रदेशच्या प्रयागराज दौऱयावर असलेले एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी शनिवारी मोठी घोषणा केली आहे. बाहुबली अतीक अहमद हे प्रयागराज येथून पक्षाचे उमेदवार असतील असे ओवैसी यांनी म्हटले आहे. यापूर्वी ओवैसी यांनी अहमद यांच्या घरी जात भोजन केले होते.
ओवैसी यांनी उत्तरप्रदेशातील 100 मतदारसंघांमध्ये स्वतःच्या पक्षाचे उमेदवार उभे करण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. ओवैसी यांना स्वतःच्या पक्षासाठी दिग्गज चेहऱयांची गरज भासणार आहे. अतीक अहमद यांच्या पत्नी शाइना यांनी यापूर्वीच एआयएमआयएममध्ये प्रवेश केला आहे. ओवैसी अलिकडेच गुजरात दौऱयावर गेले होते आणि साबरमती तुरुंगात कैद अतीक अहमद यांची भेट घेण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. परंतु प्रशासनाने त्यांना अनुमती दिली नव्हती.
बाहुबली नेते अतीक अहमद यांचा प्रयागराजमध्ये मोठा प्रभाव आहे. प्रयागराज पश्चिममधून अतीक अहमद सलग 5 वेळा आमदार राहिले आहेत. याचबरोबर समाजवादी पक्षाच्या वतीने ते फुलपूरचे खासदार म्हणून देखील निवडून आले होते. माफिया घोषित केल्यापासून अतीक यांच्या विरोधात गँगस्टर कायद्याच्या अंतर्गत कारवाई होत आहे. अतीक यांच्या अनेक मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.









