45 लाख प्रवाशांच्या पेडिट कार्डसह वैयक्तिक माहिती चोरीला
वृत्तसंस्था / मुंबई
सरकारी एअरलाइन्स एअर इंडियाच्या प्रवाशांचा डाटा लीक झाल्याचे समोर आले आहे. एअर इंडियाच्या डाटा सेंटरवर सायबर हल्ला झाला होता आणि तेव्हाच डाटा चोरी झाल्याचे वृत्त आहे. हा सायबर हल्ला फेब्रुवारीमध्ये झाल्याची माहिती एअर इंडियाने स्वतःच्या संकेतस्थळावर दिली आहे.
या सायबर हल्ल्यात प्रवाशांची वैयक्तिक माहिती चोरण्यात आली आहे. यात सुमारे 45 लाख प्रवाशांचा डाटा चोरण्यात आला आहे. यात देश आणि विदेशातील प्रवासी सामील आहेत. हा प्रकार पूर्ण जागतिक पातळीवर स्वतःच्या प्रवाशांसोबत घडला आहे. क्रेडिट कार्डचा तपशीलही चोरीस गेल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
प्रवाशांना दिली कल्पना
ही डाटाचोरी 26 ऑगस्ट 2011 आणि 20 फेब्रुवारी 2021 रोजी झाली आहे. या सायबर सुरक्षा हल्ल्यात नाव, जन्मतारीख, कॉन्टॅक्ट डिटेल्स, पासपोर्ट तपशील, तिकीटाची माहिती, स्टार अलायन्स आणि एअर इंडिया फ्रीक्वेंट फ्लायरचा डाटा चोरीस गेल्याचे कंपनीने संबंधित प्रवाशांना कळविले आहे. स्टार अलायन्स जागतिक कंपनी असून तिच्यासाब्sात एअर इंडियाची भागीदारी आहे. फ्रीक्वेंट फ्लायरचा अर्थ एअर इंडियाने नेहमी प्रवास करणारे प्रवासी असा आहे.
डाटा प्रोसेसरमध्ये डल्ला
क्रेडिट कार्डचा डाटा चोरीला गेला असला तरीही यात सीव्हीही किंवा सीवीसी क्रमांक चोरीस गेलेले नाहीत असे कंपनीने म्हटले आहे. सीव्हीव्ही नंबर कार्डमागील 3 अंकांमध्ये असतो, जो पेमेंटसाठी नमूद करणे आवश्यक असतो. एसआयटीए पीएसएसमधून हा डाटा चोरीला गेला असून जो प्रवाशांच्या सेवेसाठी डाटा प्रोसेसरचे काम करतो. तोच डाटा स्टोरिंग आणि प्रोसेसिंगसाठी जबाबदार असतो. सायबर हल्ल्याप्रकरणी 25 फेब्रुवारी रोजी माहिती देण्यात आली होती, त्यानंतर 25 मार्च आणि 5 एप्रिल रोजी माहिती देण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे.
चौकशी सुरू
डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी चौकशी करण्यासह विविध पावले उचलली जात आहेत. तसेच बाहेरील तज्ञाला डाटा सुरक्षेकरता जबाबदारी देण्यात आली आहे. एअर इंडियाच्या एफएफपी प्रोग्रामचा पासवर्डही बदलला जात आहे. भविष्यात डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतःचा पासवर्ड बदला असे एअर इंडियाने प्रवाशांना सांगितले आहे.









