नवी दिल्ली / वृत्तसंस्था
एअर इंडियाचे मे अखेरपर्यंत खाजगीकरण होणार असल्याचे स्पष्ट संकेत शनिवारी नागरी हवाई उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिले. एअर इंडियाचा 100 टक्के हिस्सा विकला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. एअर इंडिया कंपनी सध्या डबघाईला गेली असल्याने एकतर ती बंद करणे किंवा विकणे याव्यतिरिक्त केंद्र सरकारकडे कोणताही पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या 100 टक्के हिस्सेदारी विकण्याचा निर्णय निश्चित झाला आहे, असे हरदीप सिंह पुरी यांनी एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले.
सरकारी एअरलाईन्स कंपनी एअर इंडियाच्या खासगीकरणाबाबत सरकार आता अंतिम निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यादृष्टीने लवकरच एअर इंडियाच्या गुंतवणुकीसाठी वित्तीय लिलाव मागवले जातील. गेल्या अनेक वर्षांपासून एअर इंडिया आर्थिक तुटीचा सामना करीत आहे. सरकार एअर इंडियामधील आपले 100 टक्के भागभांडवल विकणार आहे. मे-जूनपर्यंत गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा विचारही बैठकीत मांडण्यात आला. गेल्या बैठकीत एअर इंडियामध्ये गुंतवणुकीसाठी शॉर्टलिस्ट केलेल्या लिलाव करणाऱयांची यादी तयार करण्यात आली होती आणि लिलावाची किंमत 64 दिवसांच्या आत मागविण्यात आली होती.









