नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारती एअरटेलची मोबाईल आणि ब्रॉडबँड सेवा शुक्रवारी सकाळच्या सत्रात बऱयाच ठिकाणी ठप्प झाली होती. देशाच्या विविध भागातील अनेक युजर्सनी यासंबंधी सोशल मीडियावर तक्रारी दाखल केल्या. एअरटेल नेटवर्क आउटेजमुळे इंटरनेट चालवण्यातही समस्या येत होत्या. त्यानंतर या गैरसोयीबद्दल कंपनीला दिलगिरी व्यक्त करावी लागली. तांत्रिक कारणांमुळे सेवा ठप्प झाल्याची माहिती भारती एअरटेलने दिली आहे. एअरटेलचे देशभरात 35 कोटी ग्राहक आहेत. यापूर्वी गेल्या आठवडय़ात अचानक बंद झालेल्या नेटवर्कनुळे जिओ यूजर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.
शुक्रवारी सकाळी 11 वाजल्यापासून एअरटेलचे नेटवर्क गायब झाल्याचे दिसून येत होते. अचानक खंडित झालेल्या सेवेमुळे कॉलिंग आणि मेसेजिंगमध्येही अडथळे निर्माण होत होते. ऐन कामाच्या वेळेमध्येच एअरटेलची सेवा बंद पडल्याने अनेक ठिकाणी कामांचा खोळंबा झाला. अचानक नेटवर्कची समस्या निर्माण झाल्याने मोठय़ा संख्येने युजर्सनी ट्विटरवर तक्रारी मांडल्या.









